निमसाखर -इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सुमारे सहा हजार लोकसंख्या असलेल्या निमसाखर गावातील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेबरोबरच क्रीडांगणाची अवस्था दयनीय झाली आहे. या शाळेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेत सुविधांचा वानवाच असल्याचे दिसून येत आहे. या शाळेचे क्रीडांगणाचा ग्रामस्थांनी जनावरांचे शेण व केरकचरा टाकुन उकिरडा करून टाकला आहे. निमसाखर हे राजकारणात पुढारलेलं गाव आहे.
राजकारणात रमलेल्या मंडळींना मात्र गावातील जिल्हा परिषद शाळेचा चांगलाच विसर पडलेला दिसून येत आहे. आपल्या भागातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी फिल्टरचीही सोय नाही. शाळेची इमारत ही जीर्ण झाली असुन या इमारतीचे बांधकाम 1974 मध्ये झालेले आहे. शाळेच्या छताकडे पाहिल्यास चांदण्या चमकत असल्याचाच भास होत आहे. वास्तविक पाहता सध्या या इमारतीच्या दुरुस्तीऐवजी अद्ययावत नवीन इमारतच या ठिकाणी असणे गरजेचे आहे. या शाळेत खासगी माध्यमातील शाळांना तोडीस तोड नव्हे तर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण दिले जाते.
विद्यार्थांना शिक्षण देण्याचे काम जरी शिक्षक प्रामाणिकपणे करत असले तरी शासन स्तरावरून व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या शाळांसाठी अद्ययावत सुविधायुक्त इमारत व साधन सामुग्री असणे गरजेचे आहे. निमसाखर गावठाणामधील या जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत सध्या चार शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेला सर्व साधारण पाच एकर वीस गुंठे एवढी जागा उपलब्ध आहे.
यापूर्वीच्या मंडळींनी या भागातील विद्यार्थी खेळावा गावाचं नाव कमवावं या उदात्त हेतुने मोठी जागा शाळेसाठी उपलब्ध केली.
सध्या मात्र या शाळेला संरक्षक भिंत नसल्याने अस्वच्छता असूनही जागाच बऱ्यापैकी उकिरड्यांनी व्यापलेली आहे. त्यामुळे काही अंशी या शाळेलाच उकिरड्यांचे स्वरूप आले आहे. दरम्यान आतापर्यंत चार ते पाचवेळा शिक्षक व शाळा प्रशासनाने पाठपुरावा केला आहे. तरीही या शाळेला संरक्षक भिंत मिळाली नाही.
निवडणुकांवेळीच दिसते मराठी शाळा- जिल्हा परिषदेच्या याच शाळेत निवडणुकांवेळी मतदान प्रक्रिया पार पडत असते. त्याच वेळी नेते मंडळींना ही शाळा दिसते. ही केंद्र शाळा असल्यामुळे केंद्र स्तरावरील बैठकाही या शाळेतच होत असतात. सुमारे 98 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात, त्यामुळे या शाळेची इमारत अद्ययावत व सुविधायुक्त असावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.