बंगलुरू – कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारने बहुमत गमावले असून या सरकारने त्वरीत राजीनामा द्यावा किंवा सोमवारीच विश्वास दर्शक ठराव संमत करून दाखवावा असे आव्हान प्रदेश भाजप अध्यक्ष येडियुरप्पा यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांना जर लोकशाहीची चाड असेल तर त्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी आज केली. दरम्यान आघाडीच्या आणखी एका आमदाराने राजीनामा दिल्याने कर्नाटकातील राजकीय अस्थिरता कायम आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की कॉंग्रेस-जेडीएसच्या सोळा आमदारांनी राजीनामे दिले असून दोन अपक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे, आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी कुमारस्वामी यांनी स्वताच विश्वास दर्शक ठराव मांडण्याची तयारी दर्शवल्याने भाजपच्या गोटात खळबळ माजली होती. त्यातून सावरण्यासाठी येडियुप्पा यांनी त्यांना सोमवारीच हा ठराव मांडून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. कुमारस्वामी यांनी बुधवारी विश्वास दर्शक ठराव मांडण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान आमदारांच्या राजीनाम्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असून मंगळवारी कोर्टाकडून त्यावर निर्णय येईल. त्यामुळे मंगळवार पर्यंत कर्नाटकातील सरकारला काहीही धोका नाहीं. कुमारस्वामी यांच्या प्रस्तावानुसार बुधवारी या सरकारची शक्ती परिक्षा घेतली जाऊ शकते.