कोथरूड, दि. 17 (प्रतिनिधी) -पुणे-बंगळुरू महामार्गावर चांदणी चौकात नवीन उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पाषाण आणि एनडीएला जोडणारा चांदणी चौक येथील जुना पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर चांदणी चौक येथील पूल पाडण्याचे आदेश देण्यात आले, याची तयारी गेली आठवडाभर वेगाने सुरू होती. हा पूल रविवारी (दि.18) पाडण्यात येणार होता. परंतु, काही कारणास्तव हा पूल पाडण्याचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. पूल पाडण्यासाठी विलंब का लागत आहे आणि हा पूल नक्की कधी पाडला जाणार, याबाबतचे आदेश मात्र अद्याप आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चांदणी चौकातील कोंडीत मुख्यमंत्री शिंदे अडकल्यानंतर राज्यभरात या विषयाची मोठी चर्चा झाली. त्यानंतर हा प्रश्न गांभीर्याने घेत चांदणी चौकातील पूल पाडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, त्यांच्याकडून पूल पाडण्याचे आदेश अतिशय तातडीने दिल्या गेल्यामुळे पूर्वतयारी करण्याचा अवधी देखील प्रशासनाला मिळाला नाही. कमी वेळेत हा पूल पाडण्याच्या कामाला गती आली मात्र, कमी अवधीमुळे योग्य नियोजन करता आले नसल्याने काम पुढे ढकलण्यात आले आहे.
गुरुवारपर्यंत पूर्वतयारी केली जाणार…
चांदणी चौकातील पूल पाडण्याबाबचे काम रात्रीच्यावेळी सुरू आहे. शक्य त्या ठिकाणी रात्री 12: 00 ते सकाळी 6:00 वाजेपर्यंत काम केले जात आहे. दिवसभर वाहतुकीमुळे तसेच, सततच्या पावसामुळे देखील कामात अडथळा येत आहेत, अशाही स्थितीत पूल पाडण्याचे काम 50 टक्के काम पूर्ण झाले असून गुरूवार (दि.22) पर्यंत पूल पाडण्याच्या पूर्व तयारीचे काम पूर्ण केले जाणार आहे, खूप कमी कालावधीमध्ये हे काम पूर्ण करावे लागत असल्याने याचा देखील ताण अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आहे.
पावसामुळेही कामांत अडथळे…
शहर तसेच उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे देखील पूल पाडण्याच्या कामांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये याची देखील काळजी प्रशासनाकडून घ्यावी लागत असून पाऊस थांबल्यानंतर पूर्ण नियोजन करूनच पूल पाडण्याचे काम करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.