श्रीनगर – काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यात मट्टन येथील बरघेशेखा भगवती मंदिरावर समाज कंटकांनी हल्ला करून तेथे बऱ्याच प्रमाणात मोडतोड केल्याचा प्रकार घडला आहे. हे मंदिर काश्मीरी पंडितांची कुल देवीचे मंदिर मानले जाते.
या प्रकाराची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून तेथे विशेष तपास पथक पाठवून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेचा पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
या प्रकरणातील दोषींना त्वरीत हुडकून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या दोन्ही नेत्यांनी केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.
त्यामुळे या मागचा नेमका हेतु काय असावा या बाबत विविध कयास लावले जात आहेत. दरम्यान जिल्हा प्रशासनाने यातील दोषींना हुडकून काढण्यासाठी व्यापक प्रयत्न हाती घेतले आहेत.