इस्लामाबाद – पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या अग्नेयेकडील भागात एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एका व्यक्तीला शनिवारी अटक करण्यात आली आहे, असे वृत्त स्थानिक वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे.
अशोक कुमार नावाच्या व्यक्तीने या संदर्भात तक्रार दाखल केली होती. मुहम्मद इस्माईल नावाच्या संशयिताने बांधकाम सुरू असलेल्या मंदिरातील मूर्तीची तोडफोड केली आणि तो पळून गेला.
दुर्गम बादिन जिल्ह्यात ही घटना घडली, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे. या संशयिताला काही तासांतच अटक करण्यात आली असल्याचे बादिन पोलिसांच्या प्रवक्त्याने संगितले.
इस्माईल हा मनोरुग्ण असल्याचा संशय असून त्याबाबत खातरजमा केली जात आहे. त्याने जाणीवपूर्वक हे कृत्य केले होते का हे देखील तपासले जात आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान बादिनचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक शबीर शेथार यांनी या प्रकरणी 24 तासांच्या आत चौकशी अहवाल मागवला आहे.