वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाने चौदा भारतीय भाषांमधून आपल्या निवडणूक जाहिराती आणि प्रचारपत्रके जारी केली आहेत.
ज्यो बिडेन यांच्या प्रचार यंत्रणेतील एक प्रमुख संयोजक अजय जैन भूतोरिया यांनी पुढाकार घेऊन या जाहिराती तयार केल्या आहेत. या नागरिकांना भारतीय भाषांमधून मतदानविषयक माहिती आणि प्रचाराचे साहित्य पाठवले जात आहे. बिडेन यांच्या या नवीन प्रचार पद्धतीला भारतीय नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भारतीय भाषांमधील गाण्यांमधूनही काही प्रचार व्हिडिओ जारी करण्यात आले आहेत. त्यात चले चलो बिडेन को वोट दो अशा आशयाच्या प्रचारांच्या गाण्यानाहीं चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जैन म्हणाले की, कोणताही मतदार म्युझिक, खाद्यपदार्थ आणि भाषा व आपल्या संस्कृतीशी भावनिकरित्या जोडलेला असतो. त्याचा वापर आम्ही प्रथमच या निवडणूक प्रचारात केला आहे. कमला हॅरीस यांना उपाध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आल्याने भारतीय नागरिकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाविषयी खूपच आपुलकी दिसून येत आहे त्याचा आम्हाला लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.