जगातील प्रमुख महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे नवीन अध्यक्ष म्हणून डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांची निवड जाहीर करण्यात आल्याने या महासत्तेतील महासत्तांतराच्या महानाट्यावर पडदा पडला आहे, असे म्हणावे लागेल. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नेहमीच चर्चेची आणि औत्सुक्याची बाब असली तरी यावेळी चर्चा आणि उत्सुकता पराकोटीला पोहोचली होती. विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात होते आणि पुन्हा एकदा आपण निवडून येऊ, असा त्यांना विश्वास होता; पण अमेरिकेतील सुजाण जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांना संधी न देता डेमोक्रॅटिक पक्षाचे मवाळ नेते बायडेन यांना संधी देऊन हे सत्तांतर घडवले.
3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे कल लक्षात आल्यानंतरच डोनाल्ड ट्रम्प यांनी कांगावा करायला सुरुवात केली होती. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याने आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून या निवडणुकीत विजय आमचाच आहे, अशी घोषणा त्यांनी केली होती. प्रत्यक्षात बायडेन यांच्या पारड्यात 290 आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या पारड्यात फक्त 214 मते पडल्याने अमेरिकन जनतेने आपला अध्यक्ष म्हणून बायडेन यांनाच निवडले असल्याची गोष्ट समोर आली.
अमेरिकेच्या आजपर्यंतच्या अध्यक्षांच्या इतिहासात सर्वात वादग्रस्त आणि चर्चित अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाहिले जाईल. आपले अध्यक्षपद त्यांनी गांभीर्याने घेतले आहे असे कधीच दिसले नाही. सतत वादग्रस्त वक्तव्य करणे आणि उथळपणे एखाद्या विषयावर मत व्यक्त करणे, हेच काम गेल्या चार वर्षांच्या कालावधीमध्ये ट्रम्प यांनी केले.
प्रारंभीच्या काळामध्ये ट्रम्प यांनी चालवलेली “अमेरिका फर्स्ट’ ही मोहीम अमेरिकन जनतेसाठी आकर्षक आणि राष्ट्रवादाची भावना निर्माण करणारी असली, तरी नंतर या मोहिमेतील उथळपणा सुजाण अमेरिकन जनतेच्या लक्षात आला. त्यातच गेल्या वर्षी अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या हत्येनंतर ब्लॅक लाइव्हज् मॅटर या मोहिमेने जोर पकडल्याने ट्रम्प यांच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली.
या वर्षाच्या सुरुवातीला जगात सर्वत्रच करोना संकटाच्या महामारीला सुरुवात झाल्यानंतर त्याचा फटका अमेरिकेलाही बसला. या कालावधीमध्ये ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत, असे दिसले नाही. करोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वसामान्य व्यवहार बंद ठेवण्याचा साधा निर्णय घेण्यातही प्रशासनाने कुचराई केली होती. त्याचा मोठा फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बसला.
साहजिकच आणखी चार वर्षे ट्रम्प यांच्या हातात अमेरिकेची सत्ता देण्यास सर्वसामान्य अमेरिकन नागरिक तयार नव्हता म्हणूनच बायडेन यांच्या हातात अमेरिकेची सत्ता आली आहे. हे सत्तांतर केवळ अमेरिकेसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्य म्हणजे करोनाचे संकट सुरू असतानाच बायडेन सत्ता स्वीकारणार असल्याने या समस्येवर कसा तोडगा काढतात, हे पाहण्याच्या निमित्ताने त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. अमेरिकेचे लोकप्रिय अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकिर्दीत उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे बायडेन हे परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.
राजधानी वॉशिंग्टन डीसी मधला अनेक वर्षे राजकारणाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. जीभेवर साखर ठेवून बोलणारा नेता, अशी त्यांची जागतिक राजकारणातही ओळख आहे. बायडेन यांचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते अगदी सहजपणे सामान्य माणसात मिसळतात. खासगी आयुष्यात बायडेन यांनी अनेक चढ-उतार पाहिलेत आणि अनेक संकटं झेलली आहेत. 47 वर्षांपूर्वी त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1973 साली ते सिनेट सदस्य म्हणून निवडून गेले होते, तर 1987 साली म्हणजे तब्बल 33 वर्षांपूर्वी ते पहिल्यांदा अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले होते. त्यावेळी त्यांना अपयश आले, तरी अखेर अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे.
सध्याच्या कठीण काळात त्यांना अमेरिकेचे नेतृत्व करायचे आहे. एकीकडे चीनचे आव्हान आणि दुसरीकडे युरोपमध्ये पुन्हा डोके वर काढत असलेला दहशतवाद या पार्श्वभूमीवर त्यांना अमेरिकेची सूत्रे स्वीकारावी लागणार आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध आगामी काळात कसे राहतील, यावर साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. “अमेरिकेची निवडणूक म्हणजे एक चेष्टा आहे’, अशी टीका करणाऱ्या चीनबाबत बायडेन कशी भूमिका घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांच्या काळात या दोन देशांतील व्यापारयुद्धाने गंभीर रूप धारण केले होते. ट्रम्प यांच्या काळात तर हा वाद टोकाला गेला आहे. याबाबतही बायडेन यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भारतापुरते बोलायचे झाल्यास भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कसे राहतील, हे पाहावे लागेल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथेप्रमाणे बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे अभिनंदन केले असले, तरी बायडेन यांच्याशी जुळवून घेण्यासाठी मोदी यांना विशेष प्रयत्न करावे लागतील, असे दिसते.
गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी यांना टेक्सासमध्ये आमंत्रण देऊन “हाउडी मोदी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मोदी यांनी तेव्हा ट्रम्प यांचा उघड प्रचार केला होता. अर्थात, त्यापूर्वी आपल्या पहिल्या कारकिर्दीत मोदी यांनी तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांचेही मनापासून स्वागत केले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत गेल्या काही काळात रशियापेक्षाही अमेरिकेशी मैत्री करण्यास प्राधान्य देत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नवीन नेतृत्वाशी मैत्री संपादित करण्यास भारताला फारसे प्रयास पडतील, असे वाटत नाही. अमेरिकेलाही चीनबरोबर संघर्ष करण्यासाठी भारतासारख्या मोठ्या मित्राची गरज भासणार आहे.
साहजिकच या दोन देशातील संबंध आगामी काळात औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी विराजमान झाल्याने त्याचाही सकारात्मक परिणाम भारत-अमेरिका मैत्रीवर पडणार आहे. जगाच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील नाटकावर अशा प्रकारे पडदा पडल्याने जागतिक व्यवहार आता नवीन सत्तेच्या धोरणाप्रमाणे चालू राहतील, हाच या महासत्तांतराचा अर्थ मानावा लागेल.