पौड – सर्व शासकीय तक्रारी/अडचणी याची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडुन सोडवणुक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी तालुका स्तरीय लोकशाही दिवस आयोजित केला जातो. त्यानुसार मुळशी पंचायत समिती पौड येथे लोकशाही दिनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. नागरिकांच्या तक्रारी समजून घेण्यात आल्या. यावेळी महावितरण विभागाचे अधिकारी गैरहजर राहिले.
मुळशी तालुक्यातील पुढील लोकशाही दिन १७ मार्चला –
मुळशी तालुक्यातील पुढील लोकशाही दिन हा १७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय माले, २१ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय दासवे, १९ मे २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता शंकरराव गावडे कामगार भवन महानगर पालिकेशेजारी थेरगाव येथे होणार आहे. नागरिकांना आपल्या समस्या याठिकाणी मांडता येतील, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे तहसिलदार रणजित भोसले यांनी सांगितले आहे.
नागरिकांनी संबंधित विभागाची तक्रार असलेला अर्ज मुळशी तहसिल कार्यालय येथे महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत जमा करावे. संबंधित अर्जाचे निवारण लोकशाही दिनाच्या दिवशी करण्यात येणार आहे. – रणजित भोसले (तहसीलदार, मुळशी, पौड)
लोकशाही दिनाचे महत्व –
महाराष्ट्र सरकारचा लोकशाही दिन हा एक विशेष उपक्रम आहे जो प्रत्येक सोमवारी राज्य सरकार आणि त्याच्या विविध विभागांच्या कार्यालयांमध्ये आयोजित केला जातो. यामध्ये नागरिकांना त्यांच्या समस्या, शंका किंवा तक्रारी थेट सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांकडे मांडण्याची संधी दिली जाते.
लोकशाही दिनावर राज्य सरकारच्या सर्व विभागांचे अधिकारी आणि मंत्री नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. यामुळे सरकार आणि जनतेच्या दरम्यान संवाद वाढतो आणि लोकांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवता येतात.
या उपक्रमाचा उद्देश लोकशाहीत लोकांचा सहभाग वाढवणे आणि प्रशासनाला अधिक पारदर्शक व उत्तरदायित्व बनवणे हा आहे.