डेमीगॉड रजनीकांत


रजनीकांतचे चरित्र लिहिणारे नमन रामचंद्रन सांगतात की, रजनीकांतला “स्टाइल किंग’ म्हटले जाते. मॅनरिजम म्हणजेच लकबींमध्ये रजनीकांतचा हात धरणारा दुसरा कलावंत नाही. सामान्य माणसाची लढाई पडद्यावर दाखविणारे अनेक नायक आले आणि गेले. परंतु रजनीकांतची ही किमया कुणालाच साधली नाही. एक स्टायलिश कलाकार यापलीकडे जाऊन रजनी हा एक सहृदयी माणूस आहे. आपल्या कमाईचा अर्धा भाग रजनीकांत दान करतो, गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण, उपचार यावर तो खर्च करतो; पण ही बाब नयन रामचंद्रन यांनी रजनीकांतच्या चरित्रात लिहिली, तेव्हा रजनीकांतने तो भाग वगळायला भाग पाडले. अशा या “डेमीगॉड’ला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होणे हा त्याच्या अभिनयप्रतिभेचा यथोचित गौरव आहे.

अविश्‍वसनीय बाबींवर विश्‍वास ठेवायला लावणारा हटके अभिनय आणि अफाट लोकप्रियतेच्या बळावर उत्तुंग किर्तिशिखर गाठलेल्या अभिनेता रजनीकांतला 2019 चा दादासाहेब फाळके पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आला आहे. रजनीकांत हे 12 वे दाक्षिणात्य कलाकार आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी डॉ. राजकुमार, अक्‍किनेनी नागेश्‍वरा राव, के. बालाचंदर या ज्येष्ठ कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. तलैवा म्हणजेच बॉसचा चित्रपट रिलीज झाला म्हणजेच तो बघण्याचा बॉसचा आदेश झाला, असं मानणाऱ्या लाखो चाहत्यांच्या हृदयसिंहासनावर रजनीकांत वर्षानुवर्षे अधिराज्य करीत आहे. ज्या वयात अभिनेत्यांच्या कारकिर्दीला ओहोटी लागते, त्या वयात रजनीकांतचा चित्रपट प्रदर्शित होणार म्हणून धावत्या शहरांची पावलं थबकतात. एरवी अमेरिकेतील प्रमाणवेळेनुसार काम करवून घेणाऱ्या आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांना चक्‍क सुटी जाहीर करतात, यावरूनच या व्यक्‍तिमत्त्वाचा किती पगडा आहे, हे लक्षात येते. दक्षिणेत रजनीकांतला केवळ अभिनेता नव्हे, तर “डेमीगॉड’ म्हणजे साक्षात देव मानतात. अनेक देवळांना त्याचं नाव दिलं गेलंय. रजनीकांतची अभिनयक्षमता आणि स्टाइलमुळे त्याचे प्रशंसक अक्षरशः पागल आहेत.

सत्तर वर्षांच्या या तलैवाचा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असतो, तेव्हा तमिळनाडूतील शहरांमध्येच नव्हे, तर गावोगावी त्याची अनेक मीटर उंचीची पोस्टर आणि कटआउट लागतात. त्याचे पुतळे उभे केले जातात. विशेष म्हणजे, सध्या ज्या गोष्टीवर चित्रपट निर्मात्यांची सर्वाधिक भिस्त असते, ते “प्रमोशन’ रजनीकांतला अजिबात करावं लागत नाही. प्रमोशनच्या कोणत्याही कार्यक्रमात तो सहभागी होत नाही. आपला चित्रपट घेऊन कधीही मीडियासमोर जात नाही. रजनीकांतच्या नव्या चित्रपटावर ज्या प्रकारे प्रेक्षकांच्या उड्या पडतात, ते पाहता त्याच्या लोकप्रियतेचे वय अजून झालेले नाही, असेच म्हणावेसे वाटते.

रजनीकांत केवळ दक्षिणेतला सुपरस्टार किंवा देवच आहे, असे नाही. त्याची स्टाइल आत्मसात करण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. मागे एकदा रजनीकांत आजारी पडल्याचे वृत्त ऐकून त्याचे तब्बल 1008 फॅन मुरुगन मंदिरात जाऊन केशवपन करून आले होते. हजारो लोकांनी उपास-तापास केले. अनेकांनी रजनीकांतचे छायाचित्र असलेले लॉकेट गळ्यात घालून त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.

हिंदी चित्रपटांच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपट अधिक भडक, नाटकी असतात असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे. संवादांची शैली, मारधाड, नाचगाणी सारेच अतिरंजित असते. हाच अतिरंजितपणा प्रेक्षकांच्या लागलेल्या वेडातही दिसून येतो. त्याचे प्रशंसक प्रत्येक काम अशाच भडक पद्धतीने करू पाहतात. असं काय आहे रजनीकांतमध्ये? हा प्रश्‍न बॉलिवूडवाल्यांना पडल्याखेरीज राहत नाही. फार उंचापुरा नसलेला, सावळ्या वर्णाचा हा कलाकार अशी काय जादू करीत असेल त्याच्या चाहत्यांवर? आज चित्रपटासाठी सर्वाधिक रक्‍कम घेणारा अभिनेता म्हणून रजनीकांत ओळखला जातो. एका चित्रपटासाठी तो 100 कोटींपेक्षा अधिक रक्‍कम घेतो असे सांगितले जाते. हे सगळे घडवून आणणाऱ्या दोनच बाबी रजनीकांतकडे आहेत. एक म्हणजे हटके स्टाइल आणि दुसरी म्हणजे अभिनयप्रतिभा.

ऐंशीच्या दशकात सतत सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर रजनीकांत सुपरस्टार झाला तो “श्रीराघवेंद्र’ चित्रपटाच्या माध्यमातून. 1985 मध्ये तयार झालेल्या या चित्रपटात त्याने संताची भूमिका केली आहे. रजनीकांतचे चरित्र लिहिणारे नमन रामचंद्रन सांगतात की, रजनीकांतला “स्टाइल किंग’ म्हटले जाते. पडद्यावर त्याने सामान्य माणसाची भूमिका अधिक वेळा आणि अधिक उत्कटपणे वठविली आहे. त्याच्या प्रशंसकांना आपल्यापैकीच एकजण पडद्यावर आहे, असे वाटते. अनेक चित्रपटांत रजनीकांत सामान्य माणसासारखाच संघर्ष करताना दिसतो. आत्यंतिक साधेपणा हेच रजनीकांतचे महत्त्वाचे अस्त्र ठरले. आपल्याला चित्रपटांमधून जे काही मिळाले, ते आपल्या कल्पनेपलीकडचे आहे, असे तो म्हणतो. बंगळूर रोडवेजमध्ये कंडक्‍टर म्हणून आपण खूश होतो आणि सुट्टीच्या दिवशी नाटक करायला मिळायचे, यावर संतुष्ट होतो, असेही तो म्हणतो. चित्रपटात येऊन लोकप्रिय होणे हे आपले ध्येय कधीच नव्हते आणि एवढी अफाट लोकप्रियता अपेक्षितही नव्हती, असे साधेपणाने सांगून टाकणारा हा सच्चा माणूस लोकांना आवडणारच.

बॉलिवूडचे बडे स्टार आपला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सुटीचा दिवस शोधतात; पण रजनीकांतचा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिवशी सुटी जाहीर केली जाते, हाच इतरांची लोकप्रियता आणि रजनीकांतची लोकप्रियता यातला फरक आहे. त्याच्या लोकप्रियतेचे उदाहरण म्हणजे, 2016 मध्ये, सुमारे शंभर कोटी रुपयांत बनलेला “कबाली’ केवळ तीन दिवसांत दामदुप्पट म्हणजे दोनशे कोटी वसूल करून गेला. ही रजनीकांतचीच जादू! विशेष म्हणजे, चेन्नईमध्ये तिकिटे मिळाले नाहीत म्हणून मुंबई आणि दिल्लीपर्यंत जाऊन चित्रपट पाहणारे चाहते रजनीकांतला लाभले आहेत.

समर्पित वृत्तीने काम करणे ही रजनीकांतची खासीयत आहे. अशा वेळी कथा, पटकथा, संवाद आणि इतर तांत्रिक बाबी खूपच दुय्यम ठरतात. चित्रपट भडक आहे की कथा ढिसाळ आहे, याला महत्त्वच उरत नाही आणि रजनीकांतचा जोश पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात. “लिंगा’ या चित्रपटात रजनीकांतची नायिका होती सोनाक्षी सिन्हा. ती त्याच्या मुलीच्या वयाची आहे; परंतु संपूर्ण चित्रपटात तसे कुठेही वाटत नाही, हीच तर रजनीकांतची कमाल. एरवी चित्रपटातील रजनीकांतचे असंभवनीय वाटणारे कारनामे एरवी विनोदाचा विषय ठरतात; पण जेव्हा त्याचा चित्रपट प्रदर्शित होणार असतो आणि त्याचे मोठमोठे कटआऊट लागतात, तेव्हा वातावरण बदलून जाते. हे असंभवनीय कारनामे आपण पाहायलाच हवेत, असे प्रत्येकाला वाटू लागते याचे एकमेव कारण म्हणजे तो “रजनीकांत’ आहे.

रजनीकांत लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. थोडा मोठा होताच रजनीकांतला कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे ओझे उचलण्यापासून अनेक कामे करावी लागली. बंगळुरूमध्ये कंडक्‍टरची नोकरी त्याने केली. जीवनात फार मोठा संघर्ष रजनीकांतला करावा लागला. परंतु ज्याप्रमाणे चित्रपटातील नायक कोणत्याही आव्हानांपुढे हार मानत नाही, त्याप्रमाणे रजनीकांतने त्याच्या जीवनात कोणत्याही संकटापुढे गुडघे टेकले नाहीत. “अपूर्व रागंगल’ हा त्याचा पहिला चित्रपट. कमल हासन या चित्रपटाचा नायक होता, तर रजनीकांत खलनायक. एक दिवस हा किरकोळ शरीरयष्टीचा अभिनेता “स्टाइल किंग’ बनून संपूर्ण दक्षिण भारत हादरवून सोडणार आहे, याची त्यावेळी कुणी कल्पनाही केली नसेल.

आज प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालेला असतानासुद्धा रजनीकांतचा साधेपणा आणि विनम्रता नजरेत भरण्याजोगी आहे. खऱ्या अर्थाने तो हिरो आहे. एखाद्या हिरोच्या पुतळ्याला त्याचे प्रशंसक दुग्धाभिषेक करतात, हे पाहून संबंधित हिरोचे पाय जमिनीवर राहणार नाहीत. परंतु ही घटना जेव्हा रजनीकांतच्या बाबतीत घडली, तेव्हा त्याने जाहीर आवाहन केले की, माझ्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालण्याऐवजी तेच दूध गरीब मुलांना द्या. असा आहे हा सर्वसामान्यांचा तलैवा! द बॉस! डेमीगॉड!

– सोनम परब

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.