दलित, आदिवासींचा तहसीलवर मोर्चा

मुलाच्या हत्येप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी  

श्रीगोंदा – तालुक्‍यातील भानगाव (ता. श्रीगोंदा) येथे आदिवासी पारधी समाजाच्या दोन वर्षांच्या निरागस बालकाची हत्या करण्यात आली. तसेच मुलाच्या वडिलांसह एका महिलेस मारहाण करून जबर जखमी करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ दलित व आदिवासी संघटनांच्या वतीने आज निषेध रॅली काढून तहसीलवर आक्रोश मोर्चा नेण्यात आला. यावेळी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी आंदोलकांनी जिल्हा जातीय अत्याचारग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा, सदरील प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, विशेष सरकारी वकिलांमार्फत खटला लढविण्यात यावा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, आदिवासी पारधी व भिल्ल समाजाचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी तत्काळ योजना तयार करुन अंमलबजावणी करावी, पीडित कुटुंबीयांची हेळसांड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे, आदी मागण्या केल्या.

राजेंद्र काळे, शिवाजी गांगुर्डे, कैलास माळी, दत्तात्रय माळी, तालुका कार्याध्यक्ष प्रमोद काळे, पारधी समाजाचे अभ्यासक प्रा. डॉ. बाळासाहेब बळे, आदिवासी पारधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले, भटके विमुक्त मोर्चाचे दादाहीर शिंदे, प्रदेश संयोजक संजय सावंत, भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष तात्यासाहेब घोडके, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष नंदकुमार ससाणे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष कांतिलाल कोकाटे, माजी उपनगराध्यक्ष जालिंदर घोडके, राजेंद्र राऊत यांनी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.