शिरुर : शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे शासनाची कोणतीही अंतिम मान्यता नसताना, गेली सात – आठ वर्षे सेंट चावरा स्कूलमध्ये बेकायदेशीरपणे इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात मुलांचे अतोनात नुकसान होणार आहे. शासन निर्णयानुसार, शाळांना परवानगी मिळालेल्या माध्यमात बदल करता येत नाही. धक्कादायक म्हणजे या संस्थेने मराठी माध्यमाची परवानगी घेऊन इंग्रजी माध्यमातील वर्ग नियमबाह्य रीत्या सुरू केले आहेत.
या प्रकारामुळे शासन निर्णयाची पायमल्ली झाली असून, पालकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शाळेला यू – डायस क्रमांकच नाही. अंतिम मान्यता नाही. यामुळे शालेय संहिता नियमावली १९८१ चा भंग करण्यात आला आहे. त्यामुळे सदर संस्थेवर शिक्षण विभागाने कारवाई करण्याची मागणी शिरुर शहरातील नागरिकांकडून होत आहे.
मराठी भाषेचा अपमान, तीव्र आंदोलनाचा इशारा….
मराठी राज्यात मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्याचा हा प्रकार असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मराठी माध्यमाची परवानगी असतानाही इंग्रजी माध्यम चालवणे हा मराठी भाषेचा अपमान असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड, मनसेचे शिरूर सचिव रवि लेंडे दिला आहे.
अनधिकृतपणे बिनधास्तपणे सुरू असलेली ही इंग्रजी माध्यमाची शाळा
शासन निर्णयाचा भंग, परवानगी नसताना शाळा चालू असून शिक्षण विभाग नक्की काय करतय असा सवाल उपस्थित होत आहे. या शाळेला एका बड्या राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती समोर येत असून त्यामुळे शिक्षण विभाग कारवाई करायला धजावत नसल्याचे चित्र समोर येत आहे.