वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली परिसरातील होर्डिंग चालकांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे भाजप नेते संदीप सातव यांनी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की,पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या वाघोली सह इतर 23 गावांमधील होर्डिंग चालक-मालक हे पुणे महानगरपालिकेत होर्डिंग अधिकृत करण्यासाठी सर्व होर्डिंग चालक-मालक तयार असून याबाबत त्यांनी पुणे महानगरपालिका कडे प्रस्ताव देखील सादर केले आहेत.
पण मनपाच्या वतीने होर्डिंग कर पात्र करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अधिकारी वर्गाकडून पैशाची मागणी होत असून गार्डन विभागाचा नाहरकत दाखला मिळवण्यासाठी वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाकडून १५ ते २० हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप सातव यांनी केला आहे.
प्रत्यक्ष जागेवर होर्डिंग ची पाहणी न करता हे ना हरकत दाखले गार्डन विभागाकडून दिले जात आहेत. पैसे दिल्यानंतर दाखले घरपोच आणून दिले जात आहेत. इतर विभागाचे दाखले मिळण्यासाठी देखील १५ ते २० हजार होर्डिंग चालक मालक यांना मोजावे लागत आहे. वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयात ना हरकत दाखले मिळवून प्रस्ताव सादर केल्यानंतर देखील अधिकारी वर्गाकडून प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली जात आहे.
अन्यथा हे प्रस्ताव पुढे पाठवले जात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे पैसे मिळावेत यासाठी होर्डिंग चालक मालक यांना धमकावने, त्यांचे होर्डिग कापणे यासारखे प्रकार वाघोली, खराडी हद्दीत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यासाठी जवळपास अनावश्यक लाख रुपये अधिकारी लोकांना दिले तर होर्डिंग नियमित होत आहे.
या प्रकरणी चौकशीची मागणी सातव यांनी केली आहे. पुणे महानगरपालिकेत नुकत्याच समाविष्ट झालेल्या गावांसाठी होर्डिंग साठी जास्तीचा टॅक्स लावला जात असून पुणे शहराप्रमाणे टॅक्सची आकारणी करू नये अशी मागणी सातव यांनी केली आहे.