कंपनी कर आणखी कमी करण्याची मागणी

शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचे दोन हप्ते मिळावेत

पुणे -“मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला वेगात पुढे नेण्यासाठी धाडसी उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी पुढील 3 वर्षात कंपनी कर 15 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करावा. त्याचबरोबर ग्राहकांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी प्राप्तिकर उत्पन्न मर्यादा वाढवावी आणि शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचे दोन हप्ते एकदाच देण्यात यावे,’ अशी सूचना भारतीय उद्योग महासंघाने केली आहे.

अर्थव्यवस्थेला लवकर बळ देण्यासाठी या धाडसी उपाय योजना केल्या जाव्यात, असे महासंघाने अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. शेतकरी सन्मान योजनेचे थकलेले 2 हप्ते एकदाच दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात पैसा येईल आणि ते खर्च करून मागणी वाढेल. अर्थसंकल्पात प्राप्तीकर उत्पन्न मर्यादा कमी करण्याचा धाडसी निर्णय घेतल्यानंतर जनतेच्या हातातील पैसा वाढेल. कमी होत असलेला बचत दर वाढेल, अशी सूचना करण्यात आली आहे. सरकारने शहरातील आणि खेड्यातील पायाभूत सुविधावर व अधिक खर्च करण्याची गरज आहे.

यामुळे सरकारची वित्तीय तूट अर्धा ते पाऊण टक्‍क्‍यांपर्यंत वाढली तरी हरकत नाही. मात्र अर्थव्यवस्थेला या टप्प्यात चालना देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे या संस्थेने यावेळी सांगितले आहे.

कर विवाद कमी होण्याची गरज
कर विवाद कमी होऊन कर संकलन वाढण्याची गरज आहे. मात्र, अनेकदा कर विवाद कमी होण्याऐवजी वाढत जातात. यासाठी प्रत्यक्ष कर मंडळाने माजी प्राप्तिकर अधिकारी आणि इतर तज्ञांची एक सल्लागार समिती नेमण्याची गरज आहे. ही समिती असे विवाद होऊ नयेत आणि झालेले विवाद मिटवण्यासाठी काही कालबद्ध उपाय योजना सुचवू शकेल, असे महासंघाने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.