पुणे – शहरातील करोनाबाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी पुणे शहरास व्हेंटिलेटर्स तसेच औषधे राज्यशासनाच्या माध्यमातून मदत म्हणून उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
पुण्यातील प्रशासकीय बैठकीनंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. महापालिकेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, शहरप्रमुख संजय मोरे, सह संपर्कप्रमुख शाम देशपांडे, प्रशांत बधे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे आणि उपशहर प्रमुख किरण साळी यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरात करोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. त्यातच, गंभीर होणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे शहरात ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता भासत आहे. या शिवाय, गंभीर करोनाबाधितांवर उपचारासाठी वापरली जाणारी रेमिडीसवीर टेसिलुझुमॅब ही औषधे उपलब्ध होत नाही. ही बाब लक्षात घेता ही औषधे तसेच व्हेंटिलेटर्स द्यावे, अशी मागणी केली आहे.