नवी दिल्ली – केरळमधील एका व्यक्तीने लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप घेतला आहे. सरकारला पुरेशा कोरोना लस उपलब्ध करुन देता न आल्याने मी स्वतः पैसे खर्च करुन लस घेतली आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर फोटो छापून श्रेय घेण्याचा मोदींना कोणताही अधिकार नाही, असे मत त्या व्यक्तीने मांडले आहे. तसेच याबाबत त्यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करत हा फोटो हटवण्याची मागणी केलीय. पीटर म्यालीपराम्बिल असे त्या व्यक्तीचे नाव असून ते माहिती अधिकार कार्यकर्ते असल्याची माहिती आहे.
पीटर म्यालीपराम्बिल यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. व्यक्तिगत लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो त्यांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करत आहे, असेही त्यांनी म्हटले. सरकारी लसीकरण केंद्रावर स्लॉटच उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णालयात जाऊन 750 रुपये देऊन लस घ्यावी लागली. त्यामुळे मोदींना लसीकरण प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो लावून याचे क्रेडिट घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असे त्यांचे मत आहे.
यावेळी याचिकाकर्त्यांनी अमेरिका, इंडोनेशिया, इस्राईल, कुवेत, फ्रांस आणि जर्मनी या देशांच्या लसीकरण प्रमाणपत्राची प्रतही न्यायालयासमोर सादर केली. या सर्व देशांमध्ये प्रमाणपत्रावर पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्षांचे फोटो नाहीत. हे केवळ एखाद्या व्यक्तीने लसीकरण घेतले की नाही याची खातरजमा करण्यासाठी दिलेले प्रमाणपत्र आहे. त्यामुळे त्यावर पंतप्रधान मोदींचा फोटो असण्याची कोणतीही आवश्यकता नाही. दुसऱ्या देशांनी दिलेल्या लसीकरण प्रमाणपत्रात कोणताही फोटो नसल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. सुरेश कुमार यांनी याबाबत केंद्र आणि राज्य सरकारला यावर आपले म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस पाठवली आहे.