पुणे व्यापारी महासंघाची राज्य सरकारसह पालिका प्रशासनाकडे मागणी
पुणे(प्रतिनिधी) – करोना सांसर्गामुळे संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय बंद असून, व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. व्यापार सुरू झाल्यानंतरही व्यवसायांची घडी बसायला निदान पाच ते सहा महिने लागणार आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वतीने आकारण्यात येणारे मिळकत कराच्या बिलातून एप्रिल, मे, जून व जुलै या चार महिन्याची सूट द्यावी. केवळ आठ महिन्याचा मिळकत कर आकारण्यात यावा व त्या प्रमाणे बिलात वजावट करून सुधारण्यात करण्यात यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने राज्य सरकार व महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महानगर पालिका आयुक्त शेखर गायकवाड, महापौर मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली.
रांका म्हणाले, कोव्हीड १९ ने महाराष्ट्रात मुंबई, पुणे येथे थैमान घातले असुन त्यास कंट्रोल मध्ये आणण्यासाठी १७ मार्च पासून दुकाने, ॲाफिसेस, अस्थापना, संकुल, माॅल मधील दुकाने पुर्णपणे राज्य तसेच केंद्र शासनाच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आले. याकाळात पुण्यातील २५ हजारांहून अधिक दुकाने बंद राहिली. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि राज्य सरकारकडे ही मागणी करण्यात आली आहे.