पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावित केलेल्या उच्च क्षमता वाहतूक वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्याच्या मार्गात 11 ठिकाणी बदल होणार आहेत. यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. मात्र, या सूचना मागविताना, महापालिकेकडून या बदलाचे नकाशेच उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हरकत कशी घेणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेकडून सुमारे 36 किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण उन्नत रस्ता केला जाणार आहे. मात्र, प्रशासनाने निश्चित केलेला हा रस्ता 11 ठिकाणी बांधलेली घरे, तसेच काही ठिकाणी संरक्षण विभागाच्या हद्दीतून जात आहे. त्यामुळे अशा सुमारे 11 ठिकाणी हा मार्ग बदलण्यात आला आहे.त्यात लोहगाव, वडगाव शेरी, बोपोडी, वानवडी, बिबवेवाडी, कोथरूड या भागांचा समावेश असून हे बदलण्यात आलेले अंतर सुमारे 700 ते 800 मीटर आहे.
त्यामुळे प्रशासनाकडून या बदलांना नुकतीच स्थायी समिती आणि मुख्यसभेची मान्यता घेऊन यावर आता हरकती आणि सूचना मागविल्या असून त्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली आहे. या हरकतींवर सुनावणी घेऊन त्यानंतर सुधारित मार्ग निश्चित केला जाणार आहे.