पुणे – “थोरले बाजीराव पेशवे यांच्यासारख्या वीराचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला द्यावे. तसेच मेट्रो स्थानकाला श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे नाव द्यावे,’ अशी मागणी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांसह बाजीराव पेशवे यांच्या वारसदारांनी बुधवारी केली.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 321 व्या जयंतीनिमित्त शनिवारवाड्यावरील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, शिक्षण मंडळ अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, संदीप खर्डेकर, संस्थेचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, पेशव्याचे वंशज श्रीमंत उदयसिंह पेशवा आणि कुटुंबीय, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल गानू, सचिव कुंदनकुमार साठे, उदय गांगल, श्रीकांत नगरकर, उमेश देशमुख उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाल्या, “बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनेकदा मागणी करूनही येथे पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी जिना उभारलेला नाही. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.’