जिल्ह्यात तूर डाळीची मागणी झाली कमी

211.21 क्विंटल डाळ शासकीय गोदामात पडून

डाळीचा दर्जा खालावला : स्वस्त धान्य दुकानचालकांनी फिरवली पाठ

आगामी काळात डाळ खाणार भाव
जिल्ह्यात 2018 मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, तुरीची पेरणी कमी प्रमाणात झाली. त्यामुळे डाळीचे उत्पादन कमी झाले आहे. कमी उत्पादनामुळे आगामी काळात डाळ भाव खाणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून बोलले जात आहे.

नगर – राज्यात 2016-17 च्या हंगामात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजनांतर्गत तुरीची हमीभावाने खरेदी केली. भरडाई केलेली तूरडाळ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून विक्रीस ठेवली. परंतु यंदा या डाळीला ग्राहक व स्वस्त धान्य दुकानदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सन 2018 मध्ये खरेदी केलेल्या डाळीपैकी 211.29 क्विंटल डाळ पडून आहे. त्यामुळे दुष्काळात डाळीची मागणी कमी झाली आहे. मात्र यावर्षी उत्पादन कमी झाल्याने आगामी काळात हीच डाळ भाव खाण्याची चिन्हे आहेत.

नाफेडकडून खरेदी केलेल्या तुरीची डाळ तयार करून स्वस्त धान्य दुकानांत 55 रुपये प्रतिकिलो दराने शिधा पत्रिकाधारकास देण्यात येते. डिसेंबर 2018 मध्ये 20 हजार 766 क्विंटल डाळीची मागणी जिल्हा पुरवठा विभागाने राज्य शासनाकडे केली होती. त्यापैकी 20 हजार 723 क्विंटल डाळ देण्यात आली. त्यापैकी गेल्या सहा महिन्यांत 20 हजार 512 क्विंटल डाळ वितरीत करण्यात आली.

जिल्ह्यात भीषण दुष्काळाचे सावट असून, महागाईची भर पडली आहे. डाळीचे भाव दिवसागणीक कडाडत चालले असून, आगामी काळात डाळ उच्चांक गाठेल, असे ही बोलले जात आहे. तसेच इतर जिल्ह्यात डाळीची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून, तेथे डाळ पुरवली जाते. परंतु नगर जिल्हा अपवाद ठरत असून, डाळीची मागणी कमी झाल्याचे दिसत आहे. 2018 मध्ये मागविलेली डाळ आजपर्यंत जिल्ह्या पुरवठा विभाग वितरीत करत आहे.

जिल्ह्यात एकूण 1 हजार 884 स्वस्त धान्य दुकाने कार्यरत आहेत. डिसेंबर 2018 मध्ये 20 हजार 766 क्विंटल डाळ जिल्हा पुरवठा विभागे मागवली होती. त्यापैकी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यांत डाळीची मागणी करण्यात आली नाही. डिसेंबर अखेरची डाळ आजपर्यंत जिल्हा पुरवठा विभाग वितरित करत आहे. मे महिन्यात अकोले तालुक्‍यात 23 क्विंटल डाळ वितरित करण्यात आली. त्यापाठोपाठ पारनेर तालुक्‍यात 41 क्विंटल, तर नेवासा 31 क्विंटल आणि पाथर्डी तालुक्‍यात 37 क्विंटल डाळ वितरित करण्यात आली. श्रीरामपूर, राहुरी, श्रीगोंदा, जामखेड, संगमनेर, नगर, कर्जत, शेवगाव तालुक्‍यांत डाळीचे वाटप झाले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.