महापौरांची माफी मागण्याची मागणी अन्‌ बोराटे गप्प

शिवसेनेचा बचावात्मक पवित्रा
वाकळे यांनी केला विषय दुर्लक्षित ः भाजप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक 

नगर – नगर शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना-महापौर यांच्यातील संघर्षाचे पडसाद आज झालेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेत उमटले. भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी नगर शहराचे प्रथम नागरिक महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी माफी मागावी अशी आक्रमक भूमिका घेतली. प्रेक्षक गॅलरीमधून याबाबतच्या घोषणा झाल्या. त्यामुळे सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतू महापौरांनीच याकडे दुर्लक्ष करून अंदाजपत्रकीय सभा सुरू करण्याची भूमिका घेतली. भाजप व राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले असतांना शिवसेनेने मात्र बचावात्मक पवित्रा घेतला. माफीनाम्यासाठी सभा होवू देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतरही बोराटे मात्र गप्प बसून होते.

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली अंदाजपत्रकीय सभा सुरू झाली. सुरवातीलाच सभागृहनेते स्वप्निल शिंदे यांनी नगर शहराचे प्रथम नागरीक महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या बाळासाहेब बोराटे यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर राहुल कांबळे यांनी तर बोराटे जोपर्यंत माफी मागणार नाही तोवर सभाच सुरू होवू देणार नाही अशी भूमिका घेतली. राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी तर बोराटे यांची प्रवृत्ती ठेसून काढली पाहिजे. अशा पद्धतीने महापौरांवर खालच्या पातळीवर आरोप करणे चुकीचे आहे. या प्रवृत्तीचा राष्ट्रवादी कॉंग्रेस निषेध करीत आहे. रवींद्र बारस्कर यांनी महापौरांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांनी आपली पात्रता पाहवी मगच आरोप करावेत, बोराटे माफी मागणार नाही तोवर सभा चालू देणार नाही अशी भूमिका मांडली.

यावेळी बोराटे म्हणाले, सुरवात महापौरांनी केली आहे. त्यांनी माफी मागितली तर मी देखील माफी मागेल. त्यानंतर बारस्कर, मनोज कोतकर, राहुल कांबळे, शिंदे यांनी व्यासपीठासमोर उभे राहून माफीची मागणी आग्रह ठेवली. परंतू महापौरांनी ही सभा अंदाजपत्रकीय आहे. त्यामुळे अन्य विषय नको असून म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. याला काळ उत्तर देईल, असे ते म्हणाले. महापौरांची माफी मागावी यासाठी भाजप व राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले असतांना शिवसेनेने मात्र बचावात्मक पवित्रा घेतला. अनिल शिंदे यांनी झाले ते चुकीचे झाले असे सांगून मी माफी मागतो असे ते म्हणाले. यावेळी प्रेक्षक गॅलरीमधून काही नागरिकांनी माफीनाम्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. शेवटपर्यंत बोराटे यांनी माफी काही मागितली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)