सर्दी, खोकला, ताप या करोनाच्या लक्षणांचा नागरिकांनी घेतला धसका
दरवर्षी होणारी कोट्यवधींची उन्हाळ्यातील उलाढाल ठप्प; थंड पदार्थांची चांगलीच धास्ती
पुणे – सर्दी, खोकला, ताप या करोनाच्या लक्षणांचा नागरिकांनी मोठा धसका घेतला आहे. त्यामुळे थंडपेयांबरोबरच नैसर्गिक शीतपेये असलेले ताक, दही, लस्सी, कोकम सरबत, निरा, लिंबु सरबत व आईस्क्रिमला मागणी घटली आहे. दरवर्षी होणारी कोट्यवधी रुपयांची उन्हाळ्यातील उलाढाल जवळपास ठप्प झाली आहे.
उन्हाळ्यात तापमानात वाढ झाल्याने नागरिकांचा ओढा नैसर्गिक शेतपेयांबरोबरच विविध फ्लेवरमध्ये उपलब्ध असलेल्या कोड्रींक्सकडे वळतो. या हंगामात देशभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. त्यादृष्टीने कंपन्या आपली उत्पादने बाजारात आणत असतात. यंदा मात्र करोनाने संपूर्ण जगभर घातलेल्या धुमाकुळामुळे नागरिकांनी थंड पदार्थांची चांगलीच धास्ती घेतली आहे. सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे असलेल्या नागरिकांकडे आता संशयाने पाहिले जात आहे. घरातील एखाद्या व्यक्तीला साधी शिंक आली, तरीदेखील त्याच्या तब्येतीची बारकाईने विचारपूस केली जात आहे.
उन्हाळ्यात थंडगार बर्फाचा गोळा, आईस्क्रिम, विविध प्रकारची सरबते व कोल्ड्रींक्सला विशेष मागणी असते. लॉकडाऊनमुळे बर्फाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या बंद आहेत. तर अशीच परिस्थिती आईस्क्रिम कंपन्यांची आहे. तर घरोघरी तयार केली जाणाऱ्या सरबतांवर जवळपास अघोषित बंदी टाकली आहे. तहानलेल्या व्यक्तीची तहान भागविणाऱ्या फ्रिजमधील नियमितपणे भरल्या जाणाऱ्या थंडपाण्याच्या बाटल्या आता रिकाम्या दिसत आहेत.
केवळ दुधाला सर्वाधिक मागणी
लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक सेवाअंतर्गत दूधपुरवठ्याला प्राधान्य देण्यात आले आहे. दूध डेअऱ्यांमधून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती केली जात असली तरीदेखील या पदार्थांना बाजारात फारशी मागणी नाही. त्यामुळे दूध डेअऱ्यांव्यतिरिक्त दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या उत्पादकांकडून मागणी नसल्याने दुधाची मागणीदेखील घटली आहे. याचा परिणाम साखरेच्या विक्रीवरदेखील झाला आहे.