औरंगाबाद – आयकर कारवाईची धमकी देऊन एका बांधकाम व्यावसायिकाला 60 लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 7 ऑगस्टला त्यांना एकाने फोन करून तुमच्या विरोधात आयकर खात्याने तक्रार नोंदवली असल्याची माहिती कळवली.
ही तक्रार मागे घ्यायची असेल किंवा त्यावर कारवाई व्हायची नसेल तर आयकर खात्यातील संबंधिताला 60 लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा ते तुम्हाला त्रास देतील असे या बांधकाम व्यावसायिकाला सांगण्यात आले.
दरम्यान, या बांधकाम व्यावसायिकाने आयकर खात्यात चौकशी केल्यानंतर त्याला आपल्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही असे समजले व संबंधित इसम आयकर खात्याच्या ज्या अधिकाऱ्याच्या नावाने ही खंडणी मागत होते त्या नावाचा अधिकारीच तेथे अस्तित्वात नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या इसमांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.