पोलीस उपायुक्तांच्या नावाने दोन लाखांची मागणी

  • शस्त्र परवान्यासाठी लाच 
  • पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

पिंपरी – शस्त्र परवाना प्रकरणाचा पोलीस आयुक्‍तांकडून सकारात्मक अहवाल देण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने अर्जदाराकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. हे प्रकरण पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचताच आयुक्तांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे तात्काळ निलंबन करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

पोलीस नाईक सुभाष विलास भैरट (नेमणूक – निगडी पोलीस स्टेशन. प्रतिनियुक्ती – पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक यांचे कार्यालय) असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिंचवड येथील एका व्यक्तीने शस्त्र परवाना मिळण्यासंदर्भात अर्ज केला होता. हे प्रकरण 11 मार्च रोजी पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक यांच्या कार्यालयात आले. या कार्यालयात पोलीस नाईक भैरट शस्त्र परवाना, माहिती अधिकार आणि तडीपार संदर्भातील कामकाज पाहतात. चिंचवड मधील व्यक्तीचे शस्त्र परवाना मिळण्यासाठी उपआयुक्त परिमंडळ एक या कार्यालयात प्रकरण आल्यानंतर पोलीस नाईक भैरट यांनी अर्जदार व्यक्तीला तीन वेळा फोन करून उपायुक्तांच्या नावाने दोन लाख रुपयांची मागणी केली. उपायुक्तांकडून शस्त्र परवाना प्रकरणी सकारात्मक अहवाल देण्यासाठी ही रक्कम मागितली.

याप्रकरणी नैतिक अधपतनाचे, भ्रष्टाचारास चालना देणारे, पोलीस प्रशासनाची जनमानसात प्रतिमा मलिन होण्यासारखे, अशोभनीय गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी पोलीस नाईक भैरट यांचे निलंबन केले.

कोणत्याही कामासाठी पैसे पैशाची मागणी करीत असल्यास त्याचा फोन रेकॉर्डिंग करा. जर व्हॉटस्‌ऍपवर फोन केला असेल तर दुसऱ्या फोनवरून फोन रेकार्ड करून आपल्याकडे पाठवा. आपण संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्यावर कारवाई करू, असे आश्‍वासन पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी नागरिकांना केले होते. त्यानुसार आलेल्या तक्रारीवर पोलीस आयुक्‍तांनी कारवाई केली आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अशा प्रकरणांची सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी चौकशी करत असतात. त्या चौकशीतून नेमका प्रकार उघडकीस येईल.
– मंचक इप्पर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.