मुंबई – युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीस उभा असलेल्या आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी महावितरणची यंत्रणा कामाला लावली आहे, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला आहे.
याचबरोबर या पत्रकारपरिषदेत महावितरणचे अधिकारी आणि कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीचा व्हिडिओ देखील दाखवला गेला आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. पाटील यांनी राऊत यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
भाजपा युवा मोर्चाच्या या पत्रकारपरिषदेस भाजपा नेते आशिष शेलार, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासह भाजपा युवामोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. विक्रांत पाटील म्हणाले, युवक कॉंग्रेसची अंतर्गत निवडणूक सध्या सुरू आहे. राज्यभराच्या प्रदेशाध्यक्षांपासून अनेक पदांसाठीची ही निवडणूक आहे.
त्यांच्या या निवडणुकीला आमच्याकडून मनापासून शुभेच्छा. पण आमचा आक्षेप हा आहे की, नितीन राऊत राज्याच्या उर्जा विषयक प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करून, स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता अधिक करताना दिसत असून त्याला आमचा आक्षेप आहे. मुलगा कुणाल याच्यासाठी त्यांनी महावितरणची संपूर्ण यंत्रणा कॉंग्रेस पक्षाच्या दावणीला बांधली आहे.
अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार अशा सगळ्यांवरच दबाव टाकला जात असून राज्यभर बैठका सुरू असल्याचा दावा पाटील यांनी केला. मुलाला निवडून आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनाच या नोंदणीच्या कामाला लावले गेल्याचा पाटील यांचा आरोप आहे.