गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची मागणी
सांगवी – नुकत्याच येऊन गेलेल्या पूर परिस्थितीत जुनी सांगवीतील घाटाचे प्रचंड नुकसान झाले आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही घाटाची तीच स्थिती कायम आहे. याबाबत स्थापत्य विभागाला मनसेच्यावतीने निवेदन देण्यात आले असून, गणेशोत्सवापूर्वी ही कामे पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. काम जर वेळेवर न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दशक्रिया विधी घाटावरील पाण्याच्या टाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्याअभावी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बाहेरूनच पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. तसेच येथील पाण्याची पाईपलाईनही नादुरुस्त आहे. तसेच स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झाली असून, स्वच्छतागृह नवीन बांधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व कामे गरजेची असतानाही या घाटाच्या पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. तेथे कचरा साठलेला आहे. त्याची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे. कारण एक, दीड, दोन दिवसाचे गणपती विसर्जन करताना गणेशभक्तांना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक वेळी नागरिकांनी तक्रार दाखल करण्यासाठी कार्यालयात खेटे मारण्याची अपेक्षा स्थापत्य विभाग का करते ? उघड उघड दिसत असलेली कामे विनातक्रार का करता येत नाहीत, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.