सर्व अन्नपदार्थांतून ट्रान्स फॅट्‌स काढण्याची मागणी

संग्रहित छायाचित्र

मुंबई- पॅकबंद अन्नपदार्थांमध्ये वापरला जाणारा ट्रान्स फॅट हा विषारी घटक मानवी रक्तवाहिन्यांमध्ये (धमन्यांमध्ये) अडथळे निर्माण करतो आणि त्यामुळे हृदयविकाराचे झतके येऊन हा घटक माणसाच्या मृत्युला कारणीभूत ठरतो. जगभरात पाच लाखांहून अधिक मृत्यू औद्योगिक स्तरावर उत्पादित ट्रान्स फॅटी आम्लांमुळे होतात आणि यातील 70,000 हून अधिक मृत्यू दरवर्षी भारतात होतात, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

काय आहेत ट्रान्सफॅट्‌स?

बिस्किट्‌स, स्नॅक्‍स, वेफर्स किंवा जिलेबी, लाडू, समोसा, पफ्स व केक्‍स यांसारखे पारंपरिक तसेच रस्त्यावर मिळणारे पदार्थ सर्व वयोगटांत तसेच सामाजिक-आर्थिक वर्गांत लोकप्रिय आहेत. या सर्व पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्स फॅट्‌स असतात. ट्‌या ट्रान्सफॅट्‌समुळे रक्तवाहिन्यांचे विविध आजार होतात. शिवाय हे फॅट्‌स शरिरात “मुक्त ऑक्‍सिजन कण’ (फ्री ऑक्‍सिजन रॅडिकल्स) निर्माण करतात. म्हणून पॅकबंद अन्न पुरवठ्यातून या फॅट्‌स काढून टाकणे हे हृदयविकारांचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने खूप मोठे पाऊल ठरेल.

अन्नपदार्थ अधिक सुरक्षित व निरोगी करण्याचा प्रयत्न म्हणून कट्‌स इंटरनॅशनल, सिटीझन कंझ्युमर अँड सिव्हिक ऍक्‍शन ग्रुप, कंझ्युमर व्हॉइस, जनरेशन सेव्हिअर असोसिएशन (जीएसए) आणि दिशा फाउंडेशन यांनी भारतीय अन्न सुरक्षितता व मानक प्राधिकरणाला (एफएसएसएआय) एक आठ मुद्दयांचे मागणीपत्र केंद्र सरकारकडे सादर केले आहे. भारतीय अन्नपदार्थ प्रणालीतून 2022 सालापर्यंत ट्रान्स फॅट्‌स हा घटक काढून टाकण्यासाठी तातडीने पावले उचलणे कसे आवश्‍यक आहे, यावर या पत्रात भर देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे तेल, चरबीयुक्त पदार्थ व सर्व अन्नपदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्‌सच्या समावेशास दोन टक्‍क्‍यांची मर्यादा घालण्यासाठी लवकरात लवकर अधिसूचना जारी करावी, अशी मागणीही या संस्थांनी केली आहे. देशभरात अधिक निरोगी व अधिक सुरक्षित अर्थात ट्रान्स फॅट्‌स मुक्त अन्नपदार्थांची मागणी निर्माण करण्यासाठी तसेच त्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आम्ही सर्व संस्था एकत्रितपणे काम करणार आहोत, असेही या संस्थांनी जाहीर केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)