नवी दिल्ली – सर्वसामान्य लोक वापरतात अशा फॅनवर सध्या 18 टक्के जीएसटी आहे. तो कमी करून पाच टक्के करण्यात यावा, अशी मागणी फॅन उत्पादकाच्या संघटनेने सरकारकडे केले आहे.
इंडियन फॅन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये फॅनवरील जीएसटी आवश्यकतेपेक्षा जास्त आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली. तो कमी करण्याची गरज असल्याचे पत्र सरकारला पाठवून देण्यात आले असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इतर उत्पादनापेक्षा फॅनसारख्या उत्पादनात भारत सहज आत्मनिर्भर होऊ शकतो. त्यासाठी अशा प्रकारच्या उद्योगाला अधिक चालना देण्याची गरज आहे. जर या उद्योगावरील कर आणि व्याजाचा बोजा कमी केला तर देशातील बाजारपेठेबरोबरच निर्यात क्षेत्रातही हा उद्योग आगेकूच करू शकेल, असे या संघटनेने म्हटले आहे.
दरम्यान, करोनामुळे सर्वच उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक उद्योगांनी जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. सरकारचा महसूल कमी झाला आहे. यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारदरम्यान खटके उडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार सध्या तरी कोणत्याही वस्तूवरील जीएसटी कमी करण्याची शक्यता नाही. गेल्याच आठवड्यात अर्थमंत्रालयाने वाहनांवरील जीएसटी कमी करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
त्यामुळे फॅन उत्पादकांच्या संघटनेच्या मागणीकडे सध्यातरी अर्थमंत्रालय दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे. जर जीएसटी कमी केला नाही तर बेकारी वाढेल, असे फॅन उत्पादकांचे म्हणणे आहे.
उन्हाळ्यातील विक्रीवर झाला परिणाम
मार्च महिन्यामध्ये भारतामध्ये पंख्यांची विक्री वाढते. मात्र, याच महिन्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आल्यामुळे कंपन्यांच्या आणि वितरकांच्या उलाढालीवर नकारात्मक परिणाम झालेला आहे. त्यामुळे या उद्योगाला काही सवलतींची गरज असल्याचे मत या पत्रात व्यक्त करण्यात आले आहे. देशात फॅनचे दीड लाख वितरक आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी त्यांची विक्री 35 टक्क्यांनी कमी होणार असल्याचे दिसून येते.