निळवंडेच्या कामासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी

अकोले – एकीकडे निवडणुकीचे वारे जोरात वाहत असतांना दुसरीकडे निळवंडेचे पाणी पुन्हा एकदा पेटणार आहे. निळवंडे धरणाच्या अकोले तालुक्‍यातील कालव्यांची कामे पुर्ण होत नसल्याने कालवा कृती समितीने थेट न्यायालयात धाव घेतल्यानंतर, आता जलसंपदा विभागाने येत्या आठ-दहा दिवसात, ही कामे सुरु करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील पत्र देण्यात आले असून, पोलीस अधीक्षकांकडून हा बंदोबस्त उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली.

निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाले असले तरी, अद्याप कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. अकोले तालुक्‍यात कालव्यांच्या कामाला स्थानिक लोकप्रतिनिधी वैभव पिचड यांच्यासह त्यांच्या समर्थकांचा विरोध असल्याने हे काम बंद पाडण्यात आले होते. त्यामुळे लाभक्षेत्रातील 182 गावांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाचे दरवाजे ठोठावले गेले.

न्यायालयाने संबंधितांना कामाची वस्तुस्थिती व काम थांबण्याची कारणे यासंबधीचा अहवाल मागविला होता. त्यावेळी जलसंपदा विभागाच्यावतीने न्यायालयात पोलीस बंदोबस्तात काम सुरु करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यात आले होते. त्यानंतर तातडीने संगमनेरच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी 27 मार्चला जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांना यासंबधीचे पत्र देत पोलीस बंदोबस्तात कामे सुरु करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून पोलीस संरक्षण उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

संगमनेर जलसंपदा विभागाच्या या निर्णयाबद्दल निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, अध्यक्ष रुपेंद्र काले, कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे, नानासाहेब गाढवे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, गंगाधर रहाणे, रमेश दिघे, विठ्ठल पोकळे, अशोक गांडूळे, संतोष तारगे, बाबासाहेब गव्हाणे, आबासाहेब सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, विठ्ठल देशमुख, संदेश देशमुख, राजेंद्र निर्मळ, भाऊसाहेब गव्हाणे, सोन्याबापू उऱ्हे, शरद गोर्डे, ज्ञानदेव शिंदे, तानाजी शिंदे, जालिंदर लांडे, कौसर सय्यद, सचिन मोमले, दत्तात्रय आहेर, आप्पासाहेब कोल्हे, दौलत दिघे, चंद्रकांत कार्ले, रामनाथ पाडेकर, सोमनाथ दरंदले, सोपान जोंधळे, उत्तम जोंधळे, राजेंद्र नाईक, अशोक गाढे, वाल्मिक गाढे, आदींसह निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

जलसंपदा विभागाकडे दहा महिन्यांपासून 158 कोटींचा निधी शिल्लक असतांना अकोले तालुक्‍यात 0 ते 28 कि.मी.चे काम चालू करण्यास उत्तर नगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या दबावातून चालढकल करीत होते. त्यामुळे प्रस्तावित लाभक्षेत्रातील नगर-नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी 182 गावातील शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे.

– नानासाहेब जवरे, निळवंडे कालवा कृती समिती, मार्गदर्शक

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.