नवी दिल्ली – चालू वर्षात करोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीत प्रचंड घट झाली असली तरी नव्यानेच उत्तीर्ण झालेल्या चार्टर्ड अकाउन्टंटना विविध पदांवर मोठी मागणी असल्याचे सीए इन्सिट्यूटच्या कॅम्पस प्लेसमेंटच्या आकडेवारीवरून दिसत आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊन्टंटस् ऑफ इंडियाने (आयसीएआय) सप्टेंबरमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या व्हर्च्युअल कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नव्याने उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीची ऑफर मिळण्याच्या संख्येत तब्बल 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी 2,135 जणांना ऑफर मिळाली होती. यंदाच्या वर्षी हा आकडा 2,923 वर पोचला आहे. वार्षिक वेतनातही वाढ झाली आहे. गेल्यावर्षी सरासरी 7.43 लाख वार्षिक वेतन होते. यंदा ते 8.91 लाख रुपयांवर पोचले आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने (बीपीसीएल) निवडलेल्या उमेदवाराला सर्वाधिक म्हणजे 23.28 लाख रुपये वार्षिक वेतन मिळणार आहे. गेल्यावर्षी सर्वाधिक म्हणजे वार्षिक 24 लाख रुपये वेतन पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून मिळाले होते. नव्याने उत्तीर्ण झालेल्या सीए ची निवड करणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्फोसिस, टीसीएस, जेनपॅक्ट, अक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे.
अंतिम परिक्षेच्या निकालानंतर नव्याने पात्रता प्राप्त केलेल्या `सीए’ साठी आयसीएआय दरवर्षी कॅम्पस प्लेसमेंट कार्यक्रम राबवते. यावेळी लॉकडाऊन आणि करोनामुळे हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आला. त्यावेळी वित्तसेवा, बँकिंग, आयटी, बीपीओ आणि सीए फर्म या क्षेत्रांनी एकूण भरतीपैकी 80 टक्के उमेदवारांची भरती केली.
आयसीएआयचे अध्यक्ष अतुलकुमार गुप्ता यांच्या सांगण्यानुसार, केवळ अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग चांगला असतानाच नव्हे तर सध्याच्या परिस्थितीतही `सीए’ची अधिक भूमिका महत्त्वाची ठरते. खेळते भांडवल, कंपनीचे अर्थकारण याचे व्यवस्थापन करणाऱ्या बुद्धीमान सल्लागारांची कंपन्यांना गरज असते. शिक्षण आणि प्रशिक्षणामुळे `सीए’ हे चांगले व्यवस्थापक आणि व्यवसायातील समस्यांवर पूर्ण उत्तर शोधणारे ठरतात.
अनुभवी ‘सीए’ना मागणी….
अनुभवी ‘सीए’साठी 22 आणि 28 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या करिअर असेंट कार्यक्रमात असे दिसून आले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत गरज असलेल्या कंपन्यांची संख्या दुप्पट झालेली आहे तर रिक्त जागा चारपटीने वाढलेल्या आहेत. अनुभवी ‘सीए’ची गरज असलेल्या 12 कंपन्या गेल्यावर्षीच्या कार्यक्रमात आल्या होत्या तर यंदा 29 कंपन्या आल्या होत्या. गेल्यावर्षी 226 रिक्त जागा होत्या तर यंदा एक ते वीस वर्षांचा अनुभव असलेल्या ‘सीए’साठी 899 रिक्त जागा असल्याची नोंद झाली आहे.