काठमांडू – भारताची खोडी काढून विनाकारण आपल्या सीमेवर अस्वस्थ निर्माण करून घेणाऱ्या नेपाळला आता देशांतर्गतही अस्वस्थतेला तोंड द्यावे लागणार आहे. कारण त्या देशात आता पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राच्या मागणीने डोके वर काढले आहे.
नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करा या मागणीचा येथील राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने पुनरूच्चार केला आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि माजी उप पंतप्रधान कमल थापा यांनी ही मागणी केली आहे. व्यापक राष्ट्रहीत ध्यानात घेत सरकारने हा निर्णय घ्यावा असे ट्वीट त्यांनी केले आहे. दरम्यान, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनही या मागणीसाठी स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आले आहे.
नेपाळचे विश्वा हिंदू परिषदेचे सचिव जितेंद्र कुमार म्हणाले की नेपाळमधील 82 टक्के जनता हिंदू आहे. देशाचा हिंदू राष्ट्राचा दर्जा काढून घेताना देशाच्या मूळ प्रकृतीशी छेडछाड करण्यात आली आहे. आता नेपाळला पुन्हा तो दर्जा दिला जावा ही काळाचीच मागणी आहे.
दरम्यान, या विषयावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांच्या सहकार्याची अपेक्षाही या लोकांनी व्यक्त केली आहे.