वाहनांवरील जीएसटी कपातीची सियामची मागणी

-वाहनांवर सध्या किती जीएसटी आहे – तब्बल 28 टक्‍के

-सियामला जीएसटी किती हवा आहे – 18 टक्‍के

नवी दिल्ली – वाहन विक्री वाढत नाही. त्याचबरोबर आगामी काळात नवे उत्सर्जन मानदंड लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनांच्या किमतीत आणखी दहा ते पंधरा टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वाहन विक्रीवर आणखी परिणाम होऊ शकतो. तसे झाले तर या क्षेत्रातून होणारी रोजगारनिर्मिती कमी होईल. त्यामुळे केंद्र सरकारने आणि राज्यांनी मिळून प्रवासी वाहन आणि दुचाकीवरील जीएसटी कमी करण्याची गरज असल्याचे वाहन उत्पादकांची संघटना सियामने म्हटले आहे.

सध्या प्रवासी वाहन आणि दुचाकीवर तब्बल 28 टक्के जीएसटी लागतो. त्यातच आता आणखी दरवाढ होणार असल्यामुळे वाहनांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 28 टक्के जीएसटी शिवाय वाहनांच्या लांबी आणि इंजिनाच्या प्रकारावरून एक ते पंधरा टक्के एवढा अधिभार लावला जातो. त्यामुळे या क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे सिआमचे अध्यक्ष राजेंद्र वढेरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

एप्रिल 2020 पासून बीएस 6 हे उत्सर्जन मानदंड लागू होणार आहेत. त्यामुळे वाहन उत्पादकांना त्यांच्या उत्पादन पद्धतीत सुधारणा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे खर्च वाढून वाहनांची किमती वाढणार आहेत. जर वाहनांची विक्री कमी झाली तर सरकारच्या महसुलातही घट होणार आहे. त्यामुळे जर सरकारने जीएसटीचा दर 28 टक्‍क्‍यांवरून 18 टक्के केला तर वाहन उत्पादककाबरोबरच सरकारलाही फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या वर्षाला 22 दशलक्ष एवढ्या दुचाकी विकल्या जातात. मात्र जर दुचाकींच्या किमतीत दहा टक्के वाढ केली तर त्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. कारच्या दरात 10 ते 15 टक्के वाढ केली तर कारच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो. मारुतीने दोन वेळा वाहनांच्या उत्पादनात कपात केली आहे. टीव्हीएस मोटर कंपनी आणि बजाज ऑटो या कंपन्यांनी वाहनावरील जीएसटी गरजेपेक्षा जास्त असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.