सुवर्णकार व्यावसायिकांच्या मागण्या अधिवेशनात मांडू

राधाकृष्ण विखे ः मराठवाडा, नगर जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांचा मेळावा

नगर – सराफ सुवर्णकार व्यावसायिकांच्या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या व प्रश्‍न समजून घेतले आहेत. पोलीस अधिकारी पदाचा गैरवापर करून सराफ व्यावसायिकांना सॉफ्ट टारगेट करत आहेत. पोलिसांचा हा धंदा कुठेतरी थांबला पाहिजे, यासाठी आवश्‍यक त्या नियमात बदल करण्यासाठी सराफ सुवर्णकार व्यावसायिकांचे प्रश्‍न येत्या जून महिन्याच्या अधिवेशनात मांडू. खा. दिलीप गांधी यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊन समस्या त्यांच्यापुढे मांडू. सराफ सुवर्णकार संघटनेचे नेते संतोष वर्मा हे राज्यात उदात्त हेतूने राज्यात काम करत आहेत, त्यांनी आता राष्ट्रीय स्तरावर काम करावे, असे प्रतिपादन विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी केले.

सराफ सुवर्णकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मराठवाडा विभाग व जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सराफ सुवर्णकार संघटनेचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष गणेश बेद्रे, राज्य उपाध्यक्ष सुधाकर दहिवाल, राज्य सल्लागार गणेश बागडे आदिंसह मोठ्या संख्येने सराफ सुवर्णकार व्यावसायिक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना खा. गांधी म्हणाले, सराफ सुवर्णकार व्यावसायिक हे समाजातील महत्त्वाचा घटक असून, समाजाची विश्‍वासार्हता जपणार आहे. सराफ सुवर्णकार व्यावसायिकांच्या अडचणी व प्रश्‍न संतोष वर्मा यांनी वेळोवेळी माझ्याकडे मांडले आहेत. सराफ व्यावसायिकांच्या एक्‍साईज ड्युटीचा प्रश्‍न तातडीने केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडून सोडविला आहे. संतोष वर्मा हे नि:स्वार्थपणे सराफ व्यावसायिकांच्या प्रश्‍नांबाबत लढत आहेत. त्यांना सर्वांची चांगली साथ आहे, त्यामुळे सर्व सराफ व्यावसायिकांनी संतोष वर्मा यांच्या नेतृत्वाखाली या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचेच काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात संतोष वर्मा म्हणाले, 2014 साली ज्यावेळी सराफ सुवर्णकार व्यावसायिकांवर एक्‍साईज ड्युटीचे मोठे संकट आले होते. त्यावेळी खा. दिलीप गांधी यांनी आपणास सर्वात मोठी मदत केली होती. आर्थिक नियोजन समितीच्या बैठकीत खा. गांधी व खा. चंद्रकांत खैरे यांनी आपली बाजू मांडली व सरकारला ही एक्‍ससाईज ड्युटी रद्द करण्यास भाग पाडले. तसेच विरोधपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनीही वेळोवेळी सराफ व्यावसायिकांना मोठी मदत केली आहे. कोळपेवाडी येथे घडलेल्या दरोड्याच्या घटनेत तपासात महत्तवपूर्ण भूमिका बजावली होती. या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या पाठबळ सराफ सुवर्णकार संघटनेला कायम असते.

आज सराफ व्यावसायिक सर्वात जास्त टॅक्‍स भरणारे व्यावसायिक आहेत. तरीही आम्हाला सर्वात जास्त त्रास पोलिसांकडून होत आहे. बंदुकीच्या धाकावर सराफ व्यावसायिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून लुटत आहेत. अनेकदा अटक करुन बेदम मारहाण करत आहेत. बदनामीच्या भीतीने आम्ही आवाज उठवत नाही. मात्र अजून किती वर्षे अन्याय, जाचाला आम्ही तोंड द्यायचे, आता कुठेतरी हे थांबले पाहिजे. तत्कालीन पोलीस आयुक्त शिवानंद यांनी घालून दिलेल्या आदर्श नियमांचे पालन पोलीस करत नाहीत. म्हणून विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी आमच्या प्रश्‍नात लक्ष घालावे. पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या गोपुरावर संत नरहरी महाराजांची प्रतिमा स्थापन करावी, अशीही मागणी यावेळी सराफ व्यावसायिकांनी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत बेद्रे यांनी केले. आभार कैलास मैड यांनी मानले. यावेळी हनुमान डहाळे, साई उदावंत, निलेश पंडित, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जिरेसाळ, जामखेड नगर परिषदेचे सभापती अमित चिंतामणी, कर्जतचे माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ कुलथे, जिल्हा संघटक समीर माळवे, अर्बन बॅंक संचालक अजय बोरा आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.