पुणे, – शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र, शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अॅण्ड स्टुडन्टस्, तसेच संगणक लघुलेखन परीक्षा डिसेंबर २०२४ मध्ये होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना एसटी प्रवासाचा पास द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा १४ व १५ डिसेंबर, शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा ९ ते १४ डिसेंबर, १८ ते १३ डिसेंबर व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अॅण्ड स्टुडन्टस परीक्षा २४ डिसेंबर, संगणक लघुलेखन परीक्षा २६ ते २९ डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पास उपलब्ध करून देण्याची मागणी आयुक्त अनुराधा ओक यांनी केली आहे.