पुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी? ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पुणे – पुणे पोलिस दलातील महिला पोलीस उपायुक्तांनी टिळक रस्त्यावरील एका उपाहारगृहातून पोलीस कर्मचाऱ्याला पैसे न देता बिर्याणी आणण्याचे आदेश दिल्याची ध्वनीफित प्रसारित झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

हद्दीतील उपाहारगृहचालकाला पैसे कशाला द्याायचे, असे उपायुक्तांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला सांगितल्याचे ध्वनीफितीतून उघड झाले आहे. फुकटात बिर्याणी प्रकरणाची गंभीर दखल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, महिला उपायुक्त यांनी ध्वनीफितीत तांत्रिक छेडछाड केली असल्याचा दावा केला असून याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला टिळक रस्त्यावरील उपाहारगृहातून बिर्याणी आणण्यास सांगितले. तेव्हा या कर्मचाऱ्याने मॅडम साजूक तुपातील बिर्याणी आणू का ?, असे त्यांना विचारले. महिला उपायुक्त यांनी बिर्याणीचे पैसे कसे देणार असे विचारले. तेव्हा बिर्याणी घेतल्यानंतर उपाहारगृहात पैसे देतो, असे त्याने त्यांना सांगितले. तेव्हा हद्दीतील उपाहारगृहचालकाला पैसे कशाला द्याायचे, अशी विचारणा महिला उपायुक्तांनी केली. संबंधित कर्मचारी आणि उपायुक्तांमधील संभाषणाची ध्वनीफित समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली.

याप्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गंभीर दखल  घेतली असून याप्रकरणाची पोलीस आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल, असे आदेश दिले. दरम्यान, महिला पोलीस उपायुक्त यांनी ध्वनीफित प्रसारित केली असून त्यात काही तांत्रिक बदल किंवा छेडछाड करण्यात आल्याचा (मॉर्फ) दावा केला आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी हप्तेखोरी करत होता. त्याच्यावर कारवाई केल्याने गैरप्रकारांना आळा बसला होता. माझ्यावर रोष होता. माझी बदली व्हावी तसेच माझ्यावर कारवाई होऊन मी अडचणीत यावे, या हेतूने ध्वनीफित प्रसारित केल्याचा दावा महिला उपायुक्तांनी केला आहे. याप्रकरणात सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“ही मॉर्फ ऑडिओ क्लिप आहे. यातील संदर्भ जुना आहे. माझ्या कार्यालयात जे पोलिस अधिकारी, कर्मचारी दहा-दहा वर्ष झाले ते हप्ता वसुल करायचे. त्यांची बदली करण्यात आली तरीही ते तेथून हप्ते वसूल करीत आहेत. मी आल्यापासून येथील कर्मचाऱ्याचे हितसंबध दुखावले गेले आहेत. दुसरे पण काही अधिकारी आहेत त्याचेही हित दुखावले गेले आहेत. नवीन उद्योग सुरु करण्याचे काम सांळुखे करीत होते. त्यांचे मोठे रॅकेट आहे. त्याच्याबाबत पोलिस आयुक्ताकडे मी लेखी तक्रार दिली आहे. पण अजून पोलिस आयुक्तांनी कारवाई केलेली नाही करवाई करतो, असे ते म्हणाले आहेत.” – महिला पोलिस उपायुक्त

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.