पुणे – गौरीचे आगमन मंगळवारी होणार आहे. सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या फुलांच्या मागणीत वाढ झाली. गणेशोत्सवात फुलांच्या मागणीत वाढ झाल्याने भाव तेजीत असून, झेंडूच्या भावात मात्र काही प्रमाणात घसरण झाली आहे.
सजावटीसाटी जर्बेरा, डच गुलाब, कार्नेशियन, ऑर्केड, ग्लेडिओ या फुलांचा वापर केला जातो. मार्केट यार्डातील फूल बाजारात मावळ तालुक्यातून फुलांची आवक होते. त्याचबरोबर शेवंती, गुलछडी, झेंडू या फुलांना मागणी वाढली आहे. फूल बाजारात शहर आणि उपनगर परिसरातील खरेदीदार तसेच घरगुती ग्राहकांनी सोमवारी सकाळी गर्दी केली होती. फुलांना मागणी वाढल्याने भाव तेजीत आहेत, अशी माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
पुणे, बीड, सातारा, सोलापूर तसेच कर्नाटकातील हावेरी, चिकबलापूर, चित्रदुर्ग येथून झेंडूची आवक झाली. आवक वाढल्याने झेंडूचे भाव कमी झाले. दोन दिवसांपूर्वी झेंडुचा प्रतिकिलोचा भाव प्रतवारीनुसार 200 ते 300 रुपये होता. पुणे जिल्ह्यात झेंडूला चांगले भाव मिळत असल्याने तेथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बाजारात झेंडू विक्रीस पाठविला. त्यामुळे भाव कमी झाले, असे भोसले यांनी सांगितले.
कर्नाटकातील शेतकरी येथील बाजारात कागडा विक्रीसाठी नियमित पाठवत असतात. मात्र, झेंडूला उच्चांकी भाव मिळत असल्याने तेथील शेतकऱ्यांनी झेंडू विक्रीस पाठविला. हेही झेंडूचे भाव उतरण्याचे कारण असल्याचे फूलबाजार विभागाचे प्रमुख प्रदीप काळे यांनी सांगितले. महात्मा फुले मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक, शनिपार चौक परिसरात गर्दी झाली.
फुलांचे (एक किलो) भाव
झेंडू 50 ते 200 रुपये, गुलछडी- 400 ते 500 रुपये, शेवंती- 150 ते 250 रुपये, जर्बेरा 20 ते 40 रुपये, कार्नेशियन- 50 ते 160 रुपये, ऑर्केड- 200 ते 300 रुपये, गॅल्डिओ 50 ते 100 रुपये, डच गुलाब गड्डी- 80 ते 150 रुपये.