वाघोली(प्रतिनिधी) : वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे मधील ई निविदा अंतर्गत खुली निविदा सन 2020 -21 मधील दिनांक ३० मे २०२० रोजीची सूचना क्रमांक एक व सुचना क्रमांक दोन इ निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी वाघोली, आव्हाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत वाघोली तालुका हवेली येथे दिनांक 30 मे 2020 रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने बी वन 2020 – 21 साठी सूचना क्रमांक एक व सूचना क्रमांक दोन च्या निविदा अंतर्गत खुली निविदा बाबत नोटीस काढण्यात आली असून या अंतर्गत दिनांक 15 मे 2020 रोजी दोन वाजेपर्यंत सदर कामांबाबत ई निविदाबाबत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या कामांपैकी बरीचशी कामे यापूर्वी पूर्णत्वास आली असून काही कामे अंशता बाकी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
निविदा निघाल्या पण वर्क आर्डर निघणार का? …
वाघोलीत निविदा प्रक्रियेमध्ये काही कामांबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत मात्र उर्वरित कामांबाबत नागरिकांची काही तक्रार नाही. जरी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असली तरीही वादग्रस्त अशा कामांबाबत ग्रामपंचायत वर्कऑर्डर देणार का असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने काही कामांबाबत मागवण्यात आलेल्या निविदा या बरोबर आहेत. मात्र काही कामातील निविदा ह्या केवळ कागदोपत्री रंगवल्या जात आहेत . जी कामे गेल्या पाच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्णत्वास आली आहेत अथवा या कामांपैकी दहा टक्के भाग शिल्लक असतानादेखील मग या ई निविदा काढण्याचा ग्रामपंचायतीचा हेतू काय असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
“वाघोली ग्रामपंचायतीच्या निविदा प्रकरणात गटविकास अधिकारी हवेली यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
– संदीप कोहीनकर(उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे)
याबाबत ग्रामपंचायतीच्या सर्व कार्यकारी मंडळाच्या उपस्थित दिनांक 30 मे 2020 रोजी च्या सूचना क्रमांक एक व सूचना क्रमांक दोन मधील सर्व कामांच्या बाबतीत प्रत्यक्ष पंचायत समिती व जिल्हा परिषद पुणे व ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत पाहणी करून या कामांच्या बाबत योग्य तो निर्णय घेणे व तातडीने दिनांक 30 मे रोजी च्या ई-निविदा तातडीने रद्द करून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विजय आव्हाळे यांनी पुणे जिल्हाधिकारी,पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिन कर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. वाघोली ग्रामस्थांच्या वतीने देखील मे महिन्यात या प्रकरणी ग्रामपंचायतीकडे तक्रारी आल्या आहेत.