शेतकऱ्यांचा मोबदला हडपणाऱ्यांवर कारवाईची मागणी

पिंपरी – रिलायन्स गॅस पाईपलाईन लिमिटेड या कंपनीच्या वतीने हैदराबाद ते अहमदाबाद दरम्यान गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम 2004 ते 2010 या कालावधित सुरु करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत खेड, शिरूर व मावळ तालुक्‍यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी 1962 च्या अधिनियमानुसार संपादन केल्या आहेत. परंतु, या तीन तालुक्‍यातील हजारो मूळ शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला कंपनीने नियुक्‍तकेलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हडप केल्याने या कंपनीतील भ्रष्ट यंत्रणेवर कारवाई करावी व बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने बाधित शेतकरी मारुती खलाटे (काळूस, ता. खेड), रामराव मासुळकर (करंदी, शिक्रापूर ता. शिरूर), गोविंद मोहिते (शेलपिंपळगाव, ता. खेड) व याचिकाकर्ता दीपक दौंडकर आदी उपस्थित होते. याचिकाकर्ते दौंडकर म्हणाले, तीन तालुक्‍यातील काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे. परंतु, बहुतांशी शेतकऱ्यांची भरपाई पावती आणि ना हरकत प्रमाणपत्रावर परस्पर बोगस सह्या करून हजारो कोटी रुपये हडप करण्यात आली आहे.

याबाबत बाधित शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रांत अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलीस आयुक्‍तालय, पोलीस आयुक्‍त पिंपरी चिंचवड या ठिकाणी तक्रार अर्ज करून दाद मागितली आहे. तसेच, रिलायन्स वायू वाहिनीच्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडे 2005 सालापासून अनेक वेळा शेतकऱ्यांनी लेखी हरकती देऊनही त्यांनी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली नाही. काही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जमिनी पूर्ववत केल्या असून त्यांना नुकसान भरपाई मिळणे आवश्‍यक आहे, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.