नगर – जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणारे पाथर्डी येथील लोकप्रतिनिधी व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावे. तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या पाथर्डीच्या पोलिस निरीक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे आज पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.
मागणीकडे दुर्लक्ष केल्यरास सोमवारपासून (ता. 10) उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शेवगाव यांच्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना एका लेखी निवेदनाद्वारे दिला.
1 ऑगस्टला भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांसह दुधाला योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी पाथर्डीच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर, कल्याण विशाखा पट्टणम या महामार्गावर 1 तास रस्ता रोको आंदोलन केले. त्या रस्ता रोको आंदोलनामुळे 1 तासाच्या कालावधीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा 5 किलोमीटरपर्यंत वाहने थांबली. त्यामुळे जनतेची मोठी अडवणूक झाली.
परंतु पाथर्डीच्या पोलीस निरीक्षकांनी त्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल न करता त्यांना पाठीशी घातले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.