आझमखान यांच्यावर कारवाईची मागणी

माफी न मागितल्यास निलंबीत करण्याची सुचना

नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी लोकसभेत बोलताना महिलांच्याल संबंधा आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा भाजप आणि अन्य पक्षाच्या महिला सदस्यांनी करीत त्यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला. आझम खान यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी अनेक महिला सदस्यांनी केली. जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना सभागृहातून निलंबीत करण्यात यावे अशी मागणी विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सभापतींकडे केली.

शुन्य प्रहरात हा विषय उपस्थित करताना महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की त्यांचे हे उद्‌गार लोकशाहीतील सभागृहाला आणि सदस्यांना लांच्छनास्पद आहेत. हा केवळ महिलांचा प्रश्‍न नाही तर सर्वच लोकप्रतिनिधींसाठी हा एक डाग आहे. सर्व महिला सदस्यांनी या विषयी एका आवाजात आपला रोष प्रकट केला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की महिलांच्या संबंधात आक्षेपार्ह विधाने केली गेल्यानंतर त्यावरही आपण राजकारण करण्याची गरज नाही. सर्वांनीच एका आवाजात याचा निषेध केला पाहिजे. सभापती यावर कठोर भूमिका घेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे, तृणमुल कॉंग्रेसचे कल्याण बॅनर्जी, बिजू जनता दलाचे भृतहरी महाताब, यांनी एका आवाजात आझमखान यांच्या वक्तव्यावर निषेध नोंदवला. काल ट्रिपल तलाक या विषयावर बोलताना आझम खान यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. कॉंग्रेसचे सभागृह नेते अधिररंजन चौधरी यांनीही या वक्तव्याचा निषेध केला पण त्याच वेळी त्यांनी याच सभागृहात सोनिया गांधी यांच्याविषयीही आक्षेपार्ह वक्तव्ये केली गेली होती त्याची आठवण करून दिली. पण त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी एकच गिलका करून या प्रकरणाचे राजकारण केले जाऊ नये अशी मागणी केली. सभापती ओम बिर्ला म्हणाले की सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची मी एक बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करून या प्रकरणी निर्णय घेतला जाईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)