जोहान्सबर्ग – अत्यंत संसर्गजन्य करोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमधील होत असलेल्या वाढीमुळे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी दोन आठवड्यांसाठी नव्याने निर्बंध लागू केले आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतो आहे, त्यामुळे आरोग्य सुविधांवर मोठा ताण येऊ लागला आहे.
रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या अपुरी पडायला लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांनी टिव्हीवरून केलेल्या भाषणात या निर्बंधांची घोषणा केली. रेमफोसा यांनी देशात चौथ्या श्रेणीची आपत्ती जाहीर केली आहे. याचा अर्थ संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यासाठी केवळ एक श्रेणी कमी आहे.
अंत्यविधी वगळता सर्व एकत्रीकरणांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अंत्यविधीसाठी 50 जणांचीच उपस्थिती असणार आहे. भोजनालय आणि रेस्टॉरंटमध्ये बसून अन्न ग्रहण करण्याची परवानगी नाही, केवळ पार्सलची सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय रात्रीची संचारबंदीही लागू असेल.
दक्षिण आफ्रिकेमध्ये करोनाची तिसरी लाट सुरू असून दुसऱ्या लाटेपेक्षाही या लाटेचे स्वरुप अधिक घातक आहे. या लाटेमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव अधिक आहे. दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण 15 हजारांवर पोहोचले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकातील करोना रुग्णांची एकूण संख्या 19 लाख 28 हजारांच्या घरात पोहोचली आहे. तर 60 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.