महामारीच्या काळात दिल्लीची आरोग्य व्यवस्था ढासळली नाही – अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली – करोना महामारीच्या काळात दिल्लीच्या आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला होता. पण आरोग्य व्यवस्थेत दिल्ली सरकारने केलेल्या मोठ्या सुधारणांमुळे इतका ताण येऊनही ही व्यवस्था कोसळली नाही असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

ते म्हणाले की, या महामारीच्या काळात अनेक पुढारलेल्या देशांचीही आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचा अनुभव जगाने घेतला आहे. पण दिल्लीत होम आयसोलेशन सारख्या नवीन उपायांच्या अवलंबामुळे दिल्लीची आरोग्य व्यवस्था ढासळू शकली नाही.

केजरीवाल यांनी सांगितले की होम आयसोलेशन प्रक्रियेत दिल्लीत 3 लाख 12 हजार करोना रूग्ण बरे झाले आहेत. दिल्लीतच पहिली प्लाझमा बॅंक सुरू करण्यात आली त्याचाही चांगला उपयोग झाला. दिल्लीतील 4929 करोना रूग्णांना प्लाझमा थेरपी देण्यात आली. प्रजासत्ताक दिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दिल्ली सरकारच्या तिजोरीतील निधीही संपला होता. पण तरीही आम्ही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार चालूच ठेवले आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेऊ शकलो. दिल्लीत 38 लाख घरांना आज विजेचे बिल शुन्य रूपये येत आहे. तर 14 लाख घरांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणतेही बिल भरावे लागत नाही. आता आम्ही लोकांना घरपोच रेशन देणार असून आमची ही योजनाहीं क्रांतीकारी ठरेल.

दिल्लीतील नागरीकांना हेल्थकार्ड दिले जाणार असून त्यात त्यांच्या आरोग्य विषयक नोंदी कायम ठेवल्या जाणार आहेत. दिल्ली सरकारने सरकारी आणि खासगी रूग्णालयांमध्ये हेल्फ इन्फर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम सुरू केली असून त्याद्वारे लोकांना डॉक्‍टरांची ऑन लाईन अपॉईंन्टमेंट मिळेल.

त्यामुळे त्यांना रूग्णालयांमध्ये रांगांमध्ये उभे राहण्याची वेळ येणार नाही. दिल्लीत यमुना नदीच्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असून दिल्लीतील झोपडीवासियांना आम्हीं लवकरच सदनिकांमध्ये हलवणार आहोत अशी घोषणाहीं त्यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.