नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या वेशीवर मागील दोन महिन्यांपासून कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या वतीने काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. यावेळी लाल किल्ल्यावर तोडफोड झाली होती. यातील मुख्य आरोपी असलेला दीप सिद्धू अद्याप फरार आहे. मात्र त्याचे परदेश कनेक्शन आता समोर आले आहे.
दिल्लीत झालेल्या हिंसेला जबाबदार धरून पोलिसांनी दीप सिद्धू यांचा शोध सुरू केला आहे. दिल्ली पोलिसांना फरार असलेल्या सिद्धू याच्याविषयी धक्कादायक माहिती मिळाली आहे. दीप सिद्धू यांचे फेसबुक अकाउंट परदेशातून ऑपरेट होत असल्याचे समजते. विशेष म्हणजे त्याचे अकाउंट एका महिलेकडून चालविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
दिल्ली गुन्हे अन्वेषण आणि विशेष पथकाच्या अनेक टीम दीप सिद्धूच्या शोधात आहेत. त्याला शोधून देणाऱ्याला किंवा त्याच्याविषयी माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. दीप सिद्धू हा पंजाबी अभिनेता आहे. त्यानंतर तो शेतकरी आंदोलनात सक्रिय झाला होता. मात्र काही दिवसांनंतर त्याने शेतकरी नेत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. तर दिल्ली हिंसेत तो आघाडीवर दिसून आला होता. त्यामुळे पोलिस त्याच्या शोधात आहे.