नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून दिल्लीकरांनी पुन्हा एकदा आपला कौल अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने दिला आहे. ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं असल्याने दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर सलग तिसऱ्यांदा विराजमान होण्यास अरविंद केजरीवाल सज्ज झाले आहेत.
पत्नी सुनीता यांचा वाढदिवस व दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी आल्याने अरविंद केजरीवाल व कुटुंबियांसाठी आजचा दिवस सर्वार्थाने खास ठरला आहे. लोकसभा निवडणुकांमधील आम आदमी पक्षाची पीछेहाट व विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये भाजपने झोकून दिलेली सर्व ताकद यामुळं यंदाची निवडणूक ‘आप’ला जड जाईल असे कयास बांधले जात होते. अशातच भाजपकडून वारंवार विखारी टीका केली जात असताना देखील केजरीवाल यांनी मात्र शेवटपर्यंत प्रचाराची खिंड ‘विकासाच्या’ नावाने लढवून विजय मिळवून दाखवला.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी यंदा देखील अरविंद केजरीवाल हे १४ फेब्रुवारी हाच दिवस निवडतील असा अंदाज आहे. १४ फेब्रुवारी हा दिवस जगभरामध्ये प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन-डे म्हणून साजरा केला जातो. मात्र १४ फेब्रुवारी या तारखेशी अरविंद केजरीवाल यांचे देखील एक खास कनेक्शन आहे.
२०१३ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने सर्वप्रथम निवडणूक लढवली होती. निवडणुकांचे निकाल त्रिशंकू लागल्याने ‘आप’ने काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेत राज्यात सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. मात्र काँग्रेस-आपची साथ जास्त काळ टिकली नाही व अरविंद केजरीवाल यांनी १४ फेब्रुवारी २०१४ला दिल्ली मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू झाली.
दिल्ली विधानसभेसाठी २०१५मध्ये नव्याने निवडणुका झाल्या व या निवडणुकांमध्ये केजरीवालांच्या आम आदमी पक्षाला विक्रमी यश मिळालं. ७० जागांपैकी ‘आप’ने ६७ जागा जिंकत राजधानीवर झेंडा फडकावला. १४ फेब्रुवारी २०१४ ला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेले केजरीवाल १४ फेब्रुवारी २०१५ ला स्वबळावर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.
यंदाच्या विधानसभा निवडणुका ८ फेब्रुवारी रोजी पार पडल्या असून आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. आम आदमी पक्षाने यंदाही घवघवीत यश मिळवत ६० पेक्षा अधिक जागांवर विजय प्राप्त केला असल्याने अरविंद केजरीवाल हे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार असल्याचं नक्की झालंय. अशातच आता केजरीवाल यंदाचा शपथविधी सोहळा देखील १४ फेब्रुवारी रोजी ठेवतात का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.