प्रतिक्षा संपली! पुढच्याच आठवड्यात “लसी’ची पहिली खेप दिल्लीत दाखल होणार

नवी दिल्ली – देशातील करोनाग्रस्तांची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला काही देशांमधील नियंत्रणात आलेली करोनाची परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाऊ लागली आहे. अशा परिस्थितीत देशातील नागरिकांचे लक्ष करोनावरील लस कधी येणार याकडे लागले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अर्थात पुढच्याच आठवड्यात लसीची पहिली खेप राजधानी दिल्लीत दाखल होणार आहे. दरम्यान, ही लस कोणत्या कंपनीची असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याविषयी सरकार किंवा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दिल्लीतल्या राजीव गांधी रुग्णालयात करोनावरील लस ठेवण्याची तयारी सुरु आहे. लसीचा साठा करता यावा यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. करोना व्हॅक्‍सिन केंद्रासाठी दिल्लीत दोन जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचाही समावेश आहे.

कोल्ड स्टोरेजद्वारे दिल्लीत 600 ठिकाणी कोरोना लस देण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. राजीव गांधी रुग्णालयाच्या तळ मजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर डिप फ्रिझर, कुलर, कोल्ड स्टोरेज बॉक्‍स आणि लसीचा साठा करुन ठेवण्यासंबंधीची इतर सामग्री ठेवण्यात आली आहे. 15 डिसेंबरपूर्वीच ही तयारी पूर्ण झाली आहे. आता केवळ लसीची पहिली खेप कधी येणार याकडे लक्ष लागले आहे.

कोल्ड स्टोरेजमध्ये वेगवेगळ्या लसींसाठी -40 अंश, -20 अंश आणि 2 ते 8 अंश तापमानाचे फ्रिझर बसवण्यात आले आहेत. आपत्कालीन काळात करोनावरील लसीच्या वितरणासाठी परवानगी मिळावी यासाठी आतापर्यंत फायझर इंडिया, सीरम इन्स्टिट्यूट, ऑक्‍सफोर्ड व्हॅक्‍सिन कोविशिल्ड आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. बी. एल. शेरवाल म्हणाले की, लसीकरणाच्या वेळी खबरदारी म्हणून डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी व इतर संबंधित लोक उपस्थित असतील. लसीच्या वितरणासाठी चोख सुरक्षाव्यवस्था असायला हवी. त्यासंबधीची कामं सुरु आहेत. जेणेकरुन लस योग्य हातांमध्ये पोहोचेल आणि ठरलेल्या प्राधान्यक्रमानुसार योग्य व्यक्तींना ती लस दिली जाईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.