दिल्ली वार्ता : नरेंद्र मोदी-प्रियंका गांधी सामना रंगणार 

वंदना बर्वे 

राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांना उत्तरपदेशच्या पूर्व भागाचीच जबाबदारी का दिली? हा महत्वाचा प्रश्न आहे. यामागचे लॉजिक काय? कॉंग्रेसला कोणते समीकरण साधायचे आहे? पूर्व यूपीत लोकसभेचे 35 मतदारसंघ मोडतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, या मतदारसंघात ब्राह्मण मतदारांचे वर्चस्व आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ पूर्व भागात मोडतो. याशिवाय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि कलराज मिश्र हे सुध्दा याच भागाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रियंका गांधी यांच्याशी थेट सामना करावा लागणार आहे. याच कारणामुळे ही निवडणूक हाय-प्रोफाईल झाली आहे. 

प्रियंका गांधी-वड्रा नावाचं ब्रम्हास्त्र भाजपचा किल्ला भेदणार की नाही, या प्रश्नाचं उत्तर भविष्याच्या गर्भात दडलं आहे. एक मात्र नक्की की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना “अँटी-प्रियंका मिसाईल’चा वापर करावा लागेल. कारण, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी “बहिणाबाई’ला ज्या भागाच्या मोहिमेवर पाठविलं आहे; त्याच पूर्व उत्तर प्रदेशात मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ आहे. यामुळे, नरेंद्र मोदी-प्रियंका गांधी यांचा आमना-सामना रंगणार यात शंका नाही!

पूर्व यूपीत जवळपास 35 जिल्हे आहेत. लोकसभेच्या 35 जागा आहेत. लोकसभेच्या निवडणुकीला जेमतेम दोन-तीन महिन्याचा कालावधी उरला असताना प्रियंका गांधी यांना सक्रीय राजकारणात आणण्यात आले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या बुधवारी संपत आहे. यानंतर संपूर्ण देश निवडणुकीच्या “मोड’मध्ये जाईल. निवडणूक आयोग मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल, असा अंदाज आहे.

त्यामुळे अवघ्या दोन-तीन महिन्यात प्रियंका अशी कोणती किमया साधतील, असा प्रश्न विचारला जात आहे. परंतु, त्यांच्यासाठी उत्तर प्रदेश नवीन नाही. पणजोबा पं. जवाहरलाल नेहरू, आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी हे सर्व निवडून आले ते याच राज्यातून! राहुल गांधी यांनी अमेठीतून पहिल्यांदा निवडणूक लढविली तेव्हा प्रियंका गांधी यांनी प्रथमच प्रचारकार्यात मोठी भूमिका बजावली होती.

वर्ष 1999 मध्ये अमेठीतून प्रियंकाच्या मातोश्री सोनिया गांधी यांनी प्रथमच निवडणूक लढविली तेव्हाही प्रियंका गांधी यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यानंतर अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघातील प्रचाराची धुरा त्यांच्याच हाती राहिली होती. उत्तर प्रदेश आजवर गांधी कुटुंबासाठी बालेकिल्ला राहिला असला तरी गेल्या दोन-तीन दशकापासून कॉंग्रेस या राज्यातून हद्दपार झाली आहे. अमेठी आणि रायबरेली यापलिकडे कॉंग्रेसला आपला ठसा उमटवता आलेला नाही, हे वास्तव आहे.

अशा परिस्थितीत प्रियंका गांधी यांना कॉंग्रेसचे महासचिव आणि पूर्व यूपीचे प्रभारी बनविण्यात आले आहे. अवघे दोन-तीन महिने हातात असले तरीसुध्दा लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नावाची जादू चालल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांच्यासोबत वर्षानुवर्षांपासून काम करणाऱ्या राहुल त्रिपाठी यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशात भाजप, बसप आणि सपा हे मुख्य तीन पक्ष आहेत. यात चौथा पक्ष म्हणून कॉंग्रेसचे नाव जोडता येईल. सध्या कॉंग्रेस वाळीत टाकल्यासारखा पक्ष झाला असला, तरी आधी कॉंग्रेसच मुख्य पक्ष होता. ब्राम्हणवर्ग हा भाजपचा परंपरागत मतदार. मात्र, हाच मतदार तीन दशकांपूर्वी कॉंग्रेसचा होता. माजी राज्यपाल नारायण दत्त तिवारी यांचा मुख्यमंत्री असताना देशात दबदबा होता. मात्र, मध्य प्रदेशातील कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने युपीतील कमलापती त्रिपाठी यांचा घोर अवमान केला. याच क्षणापासून यूपीतील ब्राम्हण मतदार कॉंग्रेसपासून दूर गेला. कॉंग्रेसवर नाराजी आणि बसपा तसेच सपा अमान्य असल्यामुळे ब्राम्हण मतदार भाजपकडे वळला.

आता हाच मतदार भाजपवर कमालीचा नाराज आहे. अयोध्येतील राम मंदिराशिवाय अनेक मुद्दे या सरकारने सोडवलेले नाहीत, ही बाब राहुल गांधी यांनीही ओळखली आहे. ब्राम्हणांच्या भाजपवरच्या नाराजीत कॉंग्रेसला संधी दिसते आहे. वर्ष 2014 च्या निवडणुकीत भाजपला 72 जागांवर विजय मिळाला. परंतु, यापैकी 50 टक्के खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा जोरात आहे. प्रियंका गांधी यांना याच संधीचं सोन्यात रूपांतर करायचे आहे. ही मोहीम त्या कसे फत्ते करतात? हे पहाणे रंजक ठरणार आहे.

उत्तर प्रदेशात मनोधैर्य खचलेल्या, थंड पडलेल्या कॉंग्रेसमध्ये जीव ओतण्याची जबाबदारी प्रियंका यांच्यावर आहे. मे 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची कामगिरी चांगली झाली नाही तर मोदीप्रणित सरकारच पुन्हा सत्तेत येण्याची शक्‍यता दुणावू शकते.

प्रियंका सातत्याने म्हणत असतात, “भावाला मदत करण्यासाठी मी काहीही करू शकते. त्याच्यासाठी मला एवढं करावंच लागेल.’ राहुल यांना राजकारणात यशस्वी करणं हे त्यांच्या राजकीय अस्तित्वामागची प्रेरणा आहे. कॉंग्रेसच्या कोअर कार्यकारिणीत त्यांचं नाव नोंदलं गेलं आहे.

सोनिया गांधी यांच्याकडे कॉंग्रेसचे अध्यक्षपद होतं तोपर्यंत प्रियंका गांधी यांनी राजकारणात यावं असं त्यांना वाटत नव्हतं. आता त्या मैदानात उतरल्या आहेत. हीच रणनीती युपी विधानसभेच्या निवडणुकीवेळी ठरविण्यात आली होती. प्रियंका गांधी यांना युपीत जुंपण्यापेक्षा 2019 मध्ये त्यांना देशव्यापी मोहिमेवर पाठवावे, असे त्यावेळी अनेकांचे मत होते.

युपीच्या निवडणुकीतील कॉंग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांना प्रियंका गांधी यांनी प्रचार करावा असं वाटत होतं. युपीची निवडणूक म्हणजे मिनी लोकसभा मानली जाते. म्हणून यात चांगली कामगिरी केली तर लोकसभेला आणखी चांगले होईल असं किशोर यांना वाटायचं. परंतु, युपीचे प्रभारी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांना ही बाब मान्य नव्हती. रिटा बहुगुणा-जोशी भाजपात गेल्यामुळे शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार जाहीर करावे लागले होते. का? कारण त्या ब्राम्हण आहेत.

प्रियंका गांधी यांच्यात इंदिरा गांधी यांची प्रतिमा झळकणे आणि त्या आजीसारख्या डॅशिंग वाटणे ही कार्यकर्त्यांची भावना झाली. ती सिध्द करण्याची संधी आणि जबाबदारी प्रियंका यांच्या खांद्यावर आली आहे. मात्र, प्रियंका गांधी यांना पूर्व युपीचा प्रभार दिल्यापासून भाजपात धावपळ होत आहे. त्यांना युपीच्या रणनीतीत बदल करावा लागत आहे.

कॉंग्रेसनं प्रियंका गांधी यांना फक्त निवडणूक प्रचारसभेपर्यंत मर्यादित न ठेवता युपीची संपूर्ण जबाबदारी आधीच सोपविली असती तर कॉंग्रेसचा आतापर्यंत युपीत जम बसला असता, असे राजकीय तज्ज्ञांना वाटतं. परंतु, प्रियंका गांधी यांना समोर आणलं तर राहुल गांधी मागे पडतील, अशी कॉंग्रेसला भीती होती. शिवाय, कॉंग्रेसमध्ये समान वयाचे दोन नेते राहण्याची परंपरा नव्हती. पंडित नेहरू यांच्या काळात इंदिरा गांधी सक्रिय होत्या.

दोघांच्या वयात बरेच अंतर होते. इंदिरा गांधी यांच्या काळात आधी संजय गांधी आणि नंतर राजीव गांधी सक्रिय होते. सोनिया गांधी यांच्या काळात राहुल गांधी सक्रिय आहेत. यांच्या वयातही बरेच अंतर आहे. मात्र, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या वयात खूप फरक नाही. ज्याप्रकारे एका म्यानमध्ये दोन तलवारी राहू शकत नाही, तसेच कॉंग्रेसमध्ये समान वयाचे दोन नेते सक्रिय राहू शकत नाहीत असे म्हटले जात होते.

परंतु, कॉंग्रेसने आता, प्रियंकास्त्र उपसले आहे. हे ब्रम्हास्त्र भाजपचा किल्ला भेदणार की नाही? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वाट बघावी लागेल!

Leave A Reply

Your email address will not be published.