नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून 40 कोटींहून अधिक किमतीचे 10 किलो हेरॉईन जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये टोळीतील दोन प्रमुख सदस्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी म्यानमारमधून मणिपूरमार्गे भारतात उच्च दर्जाचे ड्रग्स आणत होती. त्यानंतर तेथून हे ड्रग्स लपवून देशाच्या अन्य राज्यात पोहोचवली जात होती. आरोपी तस्कर हे अमली पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कारचा वापर करत. हे लोक गाडीच्या मागच्या सीटखाली एक खास जागा बनवून तिथे अमली पदार्थ बॉक्समध्ये ठेवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असत.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे डीसीपी जसमीत सिंग यांनी सांगितले की, नजीर आणि दिनेश सिंग अशी अटक आरोपींची नावे आहेत. स्पेशल सेलने आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.