गरजूंना मदत करणाऱ्या युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची दिल्ली पोलिसांकडून चौकशी

नवी दिल्ली – युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांची शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. करोना संकटकाळात गरजूंना औषधांसह विविध प्रकारची मदत करत असल्यावरून ती चौकशी झाल्याने कॉंग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशावरून चौकशी करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले. दिल्लीत राजकीय नेत्यांकडून रेमडेसिविर इंजेक्‍शनचे वाटप होत असल्याच्या कथित प्रकारांची चौकशी करण्याचा आदेश न्यायालयाने नुकताच दिला. त्यापार्श्‍वभूमीवर, श्रीनिवास यांची चौकशी झाली.

त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, जनतेत वितरीत करण्यासाठी मदत सामग्री कुठून मिळते याची माहिती पोलिसांना हवी होती. ती मदत सामग्री मिळवण्यासाठी आणि जनतेत वितरीत करण्यासाठी युवक कॉंग्रेसचे शेकडो कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. कुठल्या चौकशीला आम्ही घाबरणार नाही. संकटकाळात जनतेला मदत करण्यात काहीच गैर नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

दुसरीकडे श्रीनिवास यांच्या चौकशीवरून कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकार जनतेला मदत करण्याऐवजी छापासत्रात गुंतले आहे. ते कृत्य लज्जास्पद आहे, असे त्यांनी म्हटले.

मदत सामग्रीच्या वाटपावरून दिल्लीतील भाजपचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचीही पोलिसांनी चौकशी केली. त्याचा संदर्भ देऊन गंभीर यांनी चौकशीवरून राजकारण न करण्याचा शाब्दिक टोला विरोधकांना उद्देशून लगावला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.