नवी दिल्ली – जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका फरार दहशतवाद्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश मिळाले आहे. अब्दुल मजीद बाबा असे या दहशतवाद्याचे नाव असून तो जम्मू काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यातल्या माग्रेपोरा येथील रहिवासी आहे.
श्रीनगर जवळच्या सौरा येथे तो लपून बसला होता. तो तिथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर शनिवारी संध्याकाळी छापा घालून त्याला ताब्यात घेण्यात आले, असे दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलचे उपायुक्त संजीव कुमार यादव यांनी सांगितले.
अब्दुल मजीद बाबावर 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्याला श्रीनगरच्या मुख्य दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले गेले आणि त्यानंतर त्याला “ट्रान्झिट रिमांड’ मिळाल्यावर दिल्लीला नेण्यात आले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.