दिल्लीवार्ता: वरिष्ठ नेत्यांचे योगदान महत्त्वाचेच!

वंदना बर्वे

                                                    नवीन सरकार निवडण्यासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मतदान झाले. भाजप आणि कॉंग्रेसच्या प्रचाराची पद्धत बघितली तर कॉंग्रेसपेक्षा भाजप जास्त आक्रमक दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपची अख्खी टीम ताल ठोकून मैदानात होती.

महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीच्या धामधुमीत एक अपूर्ण गोष्ट म्हणजे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांनी दोन्ही राज्यांतील निवडणुकीच्या प्रचारात फारसा रस दाखविला नसल्याचे जाणवले. सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र किंवा हरियाणात एकही प्रचार सभा घेतली नाही. सोनिया गांधी यांची एकमेव प्रचार सभा शुक्रवारी हरयाणाच्या महेंद्रगडमध्ये आयोजित करण्यात आली होती.

मात्र, ही सभासुद्धा रद्द करण्यात आली. सोनिया गांधी यांच्या जागी राहुल गांधी या सभेला पोहचले. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि या निवडणुकीतील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भूपिंदरसिंग हुडा यांनी सुद्धा या रॅलीला दांडी मारली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकट्याने दोन्ही राज्यांमध्ये 25च्या वर प्रचार सभा घेतल्या आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अन्य नेत्यांच्या सभांचा आकडा मोजला तर आकडा शंभरी गाठेल. लोकसभेच्या निवडणुकीत जोशात प्रचार करणाऱ्या प्रियंका गांधी या कुठेही दिसून आलेल्या नाहीत. तर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन्ही राज्यांमध्ये फक्‍त सात सभा घेतल्यात. यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती.

महाराष्ट्र आणि हरियाणात कॉंग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांऐवजी स्थानिक नेत्यांना जास्तीत जास्त संधी देण्यात यावी असे ठरले होते. यामुळे गांधी कुटुंबातील नेत्यांच्या सभा तुलनेने कमी आयोजित करण्यात आल्यात, असा तर्क कॉंग्रेसच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिला. सोनिया गांधी यांची तब्येत तशी काही दिवसांपासून बरी नाही. तरीसुद्धा पक्षाची धुरा सध्या त्यांच्याच हातात आहे. सोनिया गांधी यांनी यंदा फक्‍त दोन सभा घेतल्या होत्या. पहिली सभा रायबरेली या मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत आणि दुसरी सभासुद्धा रायबरेली येथेच घेतली. निवडून दिल्याबद्दल लोकांचे आभार मानण्यासाठी. याशिवाय सोनिया गांधी यांनी कुठेही सभा घेतलेली नाही. एवढेच नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी सभा घेतली नव्हती.

लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्‌भवलेल्या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला तर सहज लक्षात येते की, राहुल गांधी यांना वेगळे काही तरी करायचे होते मात्र ते त्यांना करता आले नाही. पक्षातील नेत्यांनी त्यांना सहकार्य केले नाही. याच कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि त्यावर ठाम राहिले. त्यामुळे कॉंग्रेसची धुरा सोनिया गांधी यांना आपल्या हाती घ्यावी लागली. परंतु, पक्षातील नेते राहुल गांधी यांना सहकार्य करीत नसल्यामुळे जी सल मनात निर्माण झाली होती ती अद्याप कायम असल्याचे दिसते. कॉंग्रेस कार्यसमितीच्या बैठकीतही प्रियंका गांधी यांनी नेत्यांना कशाप्रकारे कोंडीत घेतले होते ही बाब सर्वांना ठाऊक आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसनं चांगलं प्रदर्शन करावं म्हणून पाच नेत्यांची नेमणूक निवडणूक प्रभारी म्हणून केली. यात, महासचिव मुकूल वासनिक (विदर्भ), राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे (मुंबई विभाग), गुजरातचे प्रभारी राजीव सातव (मराठवाडा), हिमाचल प्रदेशच्या प्रभारी रजनीताई पाटील (पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोंकण) आणि आर. सी. कुंटीया (उत्तर महाराष्ट्र) चे प्रभारी बनविण्यात आले आहे.

यापूर्वी अर्थात दोन महिन्यांपूर्वी 13 जुलै रोजी सोनिया गांधी यांनी विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या चांगल्या प्रदर्शनासाठी प्रदेशाध्यक्षासह चार कार्यकारी अध्यक्षांचीही नेमणूक केली. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्यात आले. तर, माजी मंत्री नितीन राऊत (नागपूर विभाग), आमदार ऍड. यशोमती ठाकूर (अमरावती विभाग), विश्‍वजीत कदम (पश्‍चिम महाराष्ट्र विभाग) बसवराज पाटील (मराठवाडा विभाग) आणि मुजफ्फर हुसैन (ठाणे विभाग) या चार जणांना कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले.

विधानसभेच्या निवडणुकीत चांगल्या प्रदर्शनाची जबाबदारी चार-चार कार्यकारी अध्यक्षांच्या खांद्यावर टाकली असताना याच कामासाठी आणखी पाच जणांना विभागनिहाय निवडणूक प्रभारी बनविण्याची गरज सोनिया गांधी यांना का भासली? असा प्रश्‍न निर्माण होणे स्वाभाविक आहे. शिवाय, मल्लिकार्जुन खरगे राज्याचे प्रभारी म्हणून आहेतच. मुळात, माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे प्रभारी आणि महासचिव यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावं, असं सोनिया गांधी यांचं म्हणणं होतं, अशी चर्चा आहे. महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी राहुल गांधी यांच्या विरोधात अमेठीतून लढू शकतात? मग पक्षातील नेत्यांनी लढायला काय हरकत आहे? असं त्यांचं म्हणणं होतं.

सोनिया गांधी यांच्या या निर्णयामुळं जुन्या नेत्यांची लॉबी थरारली. निवडणुकीच्या मैदानात उतरलो तर आपला निभाव लागणार नाही अशी भीती मनात निर्माण झाली. म्हणून जुन्या नेत्यांच्या लॉबीने कॉंग्रेस अध्यक्षांच्या योजनेवर पाणी सोडण्याची योजना बनविली. यासाठी दक्षिणेतील एका मोठ्या नेत्याने महाराष्ट्रातील नेत्यांचा बळी देऊन आपले काम सार्थकी नेले. सोनिया गांधी कॉंग्रेसमधील वातावरण नीट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी हंगामी अध्यक्षपद सांभाळलं असलं तरी पक्षातील वातावरण राहुल गांधी यांच्यासाठी अनुकूल बनविणे हा त्यांचा प्राथमिक हेतू आहे. परंतु, जुन्या नेत्यांच्या लॉबीमुळे यात त्यांना फारसं यश येताना दिसत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.