दिल्ली वार्ता : नवनिर्माणाची आस्था की अस्वस्थता

– वंदना बर्वे

आता काहीही झालं तरी, गांधी कुटुंबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कॉंग्रेसला नियंत्रित करणाऱ्यांचा डाव यशस्वी होणार नाही. सध्या, सव्वाशे वर्षे जुन्या कॉंग्रेसमध्ये सीनिअर नेत्यांना एकच प्रश्‍न पडला आहे तो म्हणजे, कॉंग्रेसमध्ये आपला शिक्‍का चालणार की नाही? खरं म्हणजे हा प्रश्‍न नव्हे तर भविष्याची काळजी होय. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कॉंग्रेसचा कारभार जसा चालत होता तसाच राहुल गांधी यांच्या काळातही चालत राहावा, अशी ज्येष्ठ नेत्यांची इच्छा आहे.

सोनिया गांधी या कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा असल्या तरी कॉंग्रेसची धुरा राहुल गांधी यांच्याच हातात आहे. खरे तर राहुल यांनी आपल्या हाती कॉंग्रेसची धुरा घेतल्यापासून ज्येष्ठ नेत्यांना पायाखालची जमीन सरकत असल्याची जाणीव होत आहे. आतापर्यंत पक्ष आपल्या सल्लामसलतीवर चालत होता आणि आता अचानक आपल्याला निवृत्त व्हावं लागत आहे, यामुळे ज्येष्ठ नेते अस्वस्थ झाले आहेत.त्यातूनच पत्रप्रपंच रचला गेला.

खरं म्हणजे, हे पत्र राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा होता. सोनिया गांधी हंगामी अध्यक्षा आहेत. तर, वायनाडहून कॉंग्रेसचे खासदार एवढीच काय ती राहुल गांधी यांची ओळख! हे खरं असलं तरी, सर्व निर्णय राहुल गांधी यांच्याकडूनच घेतले जातात. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिररंजन चौधरी, के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, राजीव सातव यांच्या मदतीने ते पक्षाचा गाडा हाकत आहेत. 

यामुळे जुन्या नेत्यांची मानसिक कुचंबणा होत आहे. आम्ही आमचं अख्खं जीवन पक्षाला दिलं आणि आता आम्हाला बाजूला सारलं जात आहे, ही उपेक्षा ज्येष्ठ नेत्यांना मान्य नाही. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात जशी सेवा आम्ही करीत होतो तशीच पुढेही करण्याची संधी द्यावी, असे या नेत्यांना वाटतं.

सूत्रानुसार, राहुल गांधी यांचे मत मात्र वेगळं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात जवळपास 50 वर्षांपर्यंत देशात कॉंग्रेसची सत्ता होती. या काळात याच ज्येष्ठ मंडळींनी किंवा त्यांच्या वडिलांनी सत्ता उपभोगली. कॉंग्रेस सत्तेत होती म्हणून ही मंडळी कॉंग्रेसशी जुळून राहिलीत. मात्र, यापैकी किती नेत्यांनी कॉंग्रेसला वाढविण्याचे प्रयत्न केलेत? सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात 2004 मध्ये देशात पुन्हा कॉंग्रेसचं सरकार आलं.

डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात हीच ज्येष्ठ मंडळी मंत्री होते. 2014 पर्यंत सर्वांनी सत्ता उपभोगली. एकीकडे, अब्जावधीची माया जमविली, तर दुसरीकडे भाडे द्यायलासुद्धा कॉंग्रेसकडे पैसे नाही. ही वास्तविकता आहे. म्हणूनच, कॉंग्रेस श्रीमंत नेत्यांचा गरीब पक्ष आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या होत्या.

कॉंग्रेस पक्षात आपलं स्थान अबाधित ठेवण्याची इच्छा असलेल्या नेत्यांपैकी एकही जण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तोंड उघडायला तयार नाही. अर्थात, गांधी कुटुंबाने संघर्ष करायचा. गांधी कुटुंबाच्या नावावर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळाली की, पक्ष आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचे. हा प्रकार आता चालू द्यायचा नाही, असं राहुल गांधी यांचे मत असल्याचे सूत्राचं म्हणणं आहे.

यात किंचितही दुमत नाही की, कॉंग्रेसचे पुढील अध्यक्ष राहुल गांधी हेच असतील. मात्र, अध्यक्षपदाच्या काळात ज्येष्ठ मंडळी आपल्यासोबत राहणार नाही आणि ते राहतील तर आपण राहणार नाही. यामुळे त्यांनी तरुणांना संधी द्यावी आणि मार्गदर्शन करावे, अशी त्यांची इच्छा आहे. ही बाब ज्येष्ठांना न पटणारी आहे. म्हणूनच पत्रप्रपंच निर्माण झाला. मात्र, दुर्दैवाने हा डाव उलटला. पितळ उघडे पडल्यामुळे कॉंग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत यातील अनेक नेत्यांना क्षमा मागावी लागली. काहींनी दिलगिरी व्यक्‍त केली.

पक्षाची आम्हाला खूप काळजी आहे आणि कॉंग्रेसची अधोगती आमच्याने बघविली जात नाही, असं सुचवितानाच यातून बाहेर पडण्यासाठी नेतृत्वबदल होण्याची गरज असल्याचे सूचित केले. सगळे काही गुपचूपपणे सुरू होतं. पत्र लिहिणं, त्यावर स्वाक्षरी घेणं सगळं काही. पत्र मीडियाच्या हाती लागू नये याचीसुद्धा खबरदारी घेतली जात होती. मात्र, लाख खबरदारी घेतल्यानंतरही हे पत्र मीडियाच्या हाती लागलं. आता चुकून हाती लागलं की कुणीतरी जाणीवपूर्वक मीडियाच्या हातात हे पत्र दिलं? हे या नेत्यांनाच ठाऊक. आता हा लेटरबॉम्ब मीडियाच्या हातात कुणी दिला? याचा शोध सुरू आहे.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्याव्यतिरिक्‍त या पत्राची प्रत 23 पैकी कोणत्याही नेत्याला देण्यात आली नव्हती. हा एक खबरदारीचा भाग होता. परंतु, कार्यसमितीच्या दिवशी ए. के. अँटोनी, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला आणि के. सी. वेणुगोपाल बैठकीला आले तेव्हा सर्वांच्या हातात हे पत्र होतं. दरम्यान, माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची या पत्रात स्वाक्षरी नसल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त केलं जात आहे. केरळहून कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर आयोजित डिनर पार्टीमध्ये चिंदबरम हेही गेले होते. याच पार्टीत सोनिया गांधी यांना पत्र लिहिण्याचा विचार मांडण्यात आला. सुरुवातीला चिदंबरम यांनी सकारात्मकता दाखविली. मात्र, नंतर हात मागे घेतले, अशी चर्चा आहे. कार्यसमितीच्या बैठकीलाही चिदंबरम यांनी दांडी मारली.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेस पक्ष हा पूर्णपणे वेगळा असेल, असं दुसऱ्या फळीतील लोकांना वाटत आहे. आणखी पाच वर्षे संघर्ष करावा लागला तरी हरकत नाही. पण, कॉंग्रेसला स्वबळावर उभं करायचं! अशी त्यांची इच्छा आहे!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.